Join us

अपमान करणाऱ्या इंग्रजांनाच आपल्या हॉटेलमध्ये बनवलं बटलर, जमशेदजी टाटांनी असा घेतला बदला

By जयदीप दाभोळकर | Updated: March 4, 2025 09:43 IST

Jamshetji Tata Birth Anniversary : भारतीय उद्योगजगताचे जनक जमशेदजी टाटा यांची आज १८६ वी जयंती आहे. त्यांनी १८६८ मध्ये टाटा समूहाची स्थापना केली, जे आज देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं आहे.

Jamshetji Tata Birth Anniversary : भारतीय उद्योगजगताचे जनक जमशेदजी टाटा यांची आज १८६ वी जयंती आहे. त्यांनी १८६८ मध्ये टाटा समूहाची स्थापना केली, जे आज देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं आहे. आज जगातील १६० हून अधिक देशांमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला असून दहा लाखांहून अधिक लोक यात काम करतात. या समूहाकडे दोन डझनहून अधिक लिस्टेड कंपन्या आहेत, त्यापैकी बऱ्याच त्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य आहेत. त्याचा व्यवसाय मीठ, डिपिंग, हॉटेल्सपासून ऑटो आणि आयटी क्षेत्रापर्यंत पसरलेला आहे. हा समूह ब्रिटिश राजवटीत सुरू झाला होता आणि अनेक दशकांपासून तो भारतातील जनतेच्या हृदयावर राज्य करत आहे. जमशेदजी टाटांच्या प्रवासावर एक नजर टाकूया…

जमशेदजींचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी गुजरातमधील नवसारी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव नुसरवानजी आणि आईचे नाव जीवनबाई टाटा होते. नुसरवानजी त्यांच्या घराण्यातील पहिले व्यापारी होते. जमशेदजींनी वयाच्या चौदाव्या वर्षी वडिलांना आधार द्यायला सुरुवात केली. जमशेदजींनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षणादरम्यान हिरा बाई डब्बू यांच्याशी विवाह केला. १८५८ मध्ये ते पदवीधर झाले आणि वडिलांच्या व्यवसायात पूर्णपणे गुंतले.

याची सुरुवात कशी झाली?

जमशेदजी टाटा यांनी १८६८ साली २१ हजार रुपयांत स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी देशावर इंग्रजांची सत्ता होती. जमशेदजींनी प्रथम दिवाळखोर तेलाचा कारखाना विकत घेतला आणि त्याचे रूपांतर कापसाच्या कारखान्यात केलं. नंतर त्याचं नाव बदलून अलेक्झांड्रा मिल असं करण्यात आलं. दोन वर्षांनंतर त्यांनी मोठ्या नफ्यात ती विकली. या पैशातून त्यांनी १८७४ मध्ये नागपुरात सूतगिरणी सुरू केली. राणी व्हिक्टोरियानं त्या काळी भारताची राणी ही उपाधी मिळवली होती आणि जमशेदजींनीही काळ समजून घेत कारखान्याला इम्प्रेस मिल असं नाव दिलं.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. जमशेदजींनी चार मोठे प्रकल्प उभारले होते. यामध्ये स्टील कंपनी, जागतिक दर्जाचं हॉटेल, शैक्षणिक संस्था आणि जलविद्युत प्रकल्पाचा समावेश होता. भारताला आत्मनिर्भर देश बनवण्याचा त्यांचा विचार यामागे होता. या प्रकल्पांमुळे टाटा समूहानं देशात आणि जगात आपला ठसा उमटवलाय. जमशेदजी टाटा यांनी परोपकारी कार्यात खूप योगदान दिलंय आणि ते विसाव्या शतकातील सर्वात मोठे दानशूर मानले जातात. १९ मे १९०४ रोजी त्यांचं निधन झालं.

ताज हॉटेलची कहाणी

जमशेदजी टाटा हे एका व्यापारी मित्राच्या आमंत्रणावरून मुंबईतील काळा घोडा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. पण इथे हॉटेलच्या गेटवरून फक्त 'गोऱ्या' लोकांना म्हणजेच इंग्रजांनाच इथे प्रवेश मिळतो, असं सांगून त्यांना परत पाठवण्यात आलं. जमशेदजी टाटा यांना त्यावेळी अपमानाचा बदला घेण्याची शपथ घेतली. केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी लोकही विनाअडथळा भेट देऊ शकतील, असं हॉटेल बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इथूनच हॉटेल ताजची सुरुवात झाली.

१६ डिसेंबर १९०२ रोजी हॉटेल ताज पहिल्यांदा पाहुण्यांसाठी खुलं करण्यात आलं. पहिल्यांदाच १७ पाहुण्यांनी ताजमहालमध्ये पाऊल ठेवलं. बार (हार्बर बार) आणि ऑल डे रेस्टॉरंटचा परवाना मिळवणारं हॉटेल ताज हे देशातील पहिलं हॉटेल होतं. वीजपुरवठा असलेलेही हे पहिलंच हॉटेल होतं. इतकंच नाही तर ताज हे देशातील पहिलं हॉटेल होतं, जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं डिस्कोथेक होतं. त्यात जर्मन लिफ्ट बसवण्यात आल्या होत्या. हे पहिलं हॉटेल होतं जिथे इंग्लिश बटलर हायर करण्यात आले होते.

टॅग्स :टाटाव्यवसायप्रेरणादायक गोष्टी