Join us
Daily Top 2Weekly Top 5

TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:55 IST

Tata Group Companies Loss: टाटा समूहासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ फारसं चांगलं राहिलेलं नाही. या काळात समूहाला व्यवस्थापनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागले. हुकुमाचा एक्का समजल्या जाणाऱ्या कंपन्यांनीच समूहाला मोठा झटका दिलाय.

Tata Group Companies Loss: टाटा समूहासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ फारसं चांगलं राहिलेलं नाही. या काळात समूहाला व्यवस्थापनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागले. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, टाटा सन्सच्या अंतर्गत सुरू झालेल्या काही नवीन व्यवसायांना (ज्यांना समूहाचे 'हुकुमाचे एक्के' मानले जात होते) आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण २९,००० कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे. हा तोटा सुरुवातीला वर्तवण्यात आलेल्या ५,७०० कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा अनेक पटीनं जास्त आहे.

आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या नऊ महिन्यांतच हा तोटा २१,७०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो संपूर्ण आर्थिक वर्ष २५ मधील १६,५५० कोटी रुपयांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. प्रामुख्याने एअर इंडिया, टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तेजस नेटवर्क्स या कंपन्यांमुळे हा तोटा वाढलाय.

सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?

नेतृत्वाच्या नियुक्तीवर परिणाम

अंदाज आणि प्रत्यक्ष कामगिरी यातील वाढत्या फरकामुळे फेब्रुवारीमध्ये झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांची तिसऱ्या कार्यकाळासाठीची फेरनियुक्ती पुढे ढकलण्यात आली. जूनमध्ये ते हा तोटा नियंत्रणात आणण्यासाठी एक योजना सादर करतील अशी अपेक्षा आहे. नोएल टाटा यांनी देखील या वाढत्या तोट्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली होती.

टाटा डिजिटलची निराशाजनक कामगिरी

२०१९ मध्ये सुरू करण्यात आलेले टाटा डिजिटल हे प्लॅटफॉर्म (ज्यामध्ये BigBasket, Tata 1mg, Croma, Tata CLiQ आणि Tata Neu यांचा समावेश आहे) समूहासाठी चिंतेचा विषय बनलेत. यात २४,००० कोटींहून अधिक गुंतवणूक करूनही अद्याप नफा मिळालेला नाही. आर्थिक वर्ष २६ मध्ये याचा तोटा ५,००० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. आर्थर डी लिटलचे व्यवस्थापकीय भागीदार थॉमस कुरुविला यांनी सांगितले की, नेतृत्व वारंवार बदलणे, उत्पादनातील सुधारणेचा संथ वेग आणि केवळ लॉयल्टी प्रोग्रामवर अवलंबून राहणं यामुळे या व्यवसायाला फटका बसला.

बिगबास्केट स्पर्धेत पिछाडीवर

कुरुविला यांच्या मते, स्पर्धक कंपन्यांनी 'डार्क स्टोअर्स'ची संख्या आणि डिलिव्हरीच्या वेगामध्ये बिगबास्केटला मागे टाकलंय. टाटा डिजिटलनं या मूलभूत गोष्टींमध्ये कमी गुंतवणूक केली. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीला ४,६१० कोटींचा तोटा झाला होता, ज्यात सर्वाधिक वाटा बिगबास्केटचा होता. त्यानंतर क्रोमा, टाटा १एमजी आणि टाटा क्लिक यांचा क्रमांक लागतो.

एअर इंडियावर मोठं संकट

टाटा डिजिटलची स्थिती बिकट असली तरी, समूहाच्या एकूण तोट्यात एअर इंडियाचा वाटा सर्वाधिक आहे. एअर इंडियाला आर्थिक वर्ष २६ मध्ये २०,००० कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे, जो आधीच्या २,००० कोटींच्या अंदाजापेक्षा दहा पटीनं अधिक आहे. पहिल्या नऊ महिन्यांतच एअरलाइन्सनं १५,००० कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे, जो आर्थिक वर्ष २५ मध्ये ११,००० कोटी रुपये होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Group's 'Ace' Fails? ₹29,000 Crore Loss Forecast

Web Summary : Tata Group faces ₹29,000 crore loss in FY26, far exceeding initial estimates. Air India and Tata Digital contribute significantly. Leadership changes are impacted due to performance gaps. Tata Digital's struggles, especially BigBasket's, add to woes.
टॅग्स :टाटाव्यवसाय