Join us  

माझ्याकडचे पैसे घ्या आणि जेट एअरवेजला कर्जबाजारी होण्यापासून वाचवा, विजय माल्याची नवी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 1:51 PM

 सरकारी बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्या याने सरकारी बँकांना पुन्हा एकदा ऑफर दिली आहे.

नवी दिल्ली -  सरकारी बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्या याने सरकारी बँकांना पुन्हा एकदा ऑफर दिली आहे. सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर माल्याने दिली आहे. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कर्जदात्यांकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते.  दरम्यान, बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवलेल्या माल्याने आज एकापाठोपाठ एक ट्विट करून जेट एअरवेजला मदत करणाऱ्या सरकारने किंगफिशर एअरलाईन्सला का मदत केली नाही, असा सवाल उपस्थित केला. जेट एअरवेज अडचणीत असताना सरकारी बँका मदतीला धावल्या आहेत. हे चित्र पाहून छान वाटते. मात्र हीच मदत किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत असताना का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत माल्ल्याने एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला.  

यावेळी बँकांची थकीत रक्कम परत करण्याच्या ऑफरचाही माल्याने पुनरुच्चार केला. मी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर माझ्या संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यातून सरकारी बँका आणि अन्य कर्जदात्यांचे पैसे परत करता येतील. बँका माझे पैसे का स्वीकारत नाहीत, हा प्रश्नच आहे. त्यांनी बाकी काही केले नाही तरी या पैशातून जेट एअरवेजला मदत करता येईल, असेही माल्याने सांगितले.  

 

टॅग्स :विजय मल्ल्याजेट एअरवेज