Join us  

टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तैवानची पेगाट्रॉन तामिळनाडूत गुंतवणूक करणार; तयार होणार मोबाईल आणि सुटे भाग

By जयदीप दाभोळकर | Published: January 31, 2021 4:36 PM

अनेक कंपन्यांची तामिळनाडू राज्याला पसंती

ठळक मुद्देअनेक कंपन्यांची तामिळनाडू राज्याला पसंतीदोन्ही कंपन्या ७ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार

कोरोनाची महासाथ त्याचसोबत अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे अनेक कंपन्या चीनमधून काढता पाय घेत आहे. केंद्र सरकारच्या नव्या योजना आणि अन्य बाबींमुळे अनेक कंपन्यांसाठी भारत ही पसंती ठरताना दिसत आहे. अशातच टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची कंपनी पेगाट्रॉन कॉर्पोरेशन भारतात स्मार्टफोन्स आणि त्याचे सुटे भाग तयार करण्यासाठी गुंतवणूक करणार आहे. दोन्ही कंपन्या आपापली गुंतवणूक वेगवेगळी करणार आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आपल्या एंटिटीच्या तर पेगाट्रॉन कॉर्पोरेशन आपल्या एंटिटीच्याद्वारे गुंतवणूक करेल. तामिळनाडू सरकारनंच याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार टाटा इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल फोनचे भाग तयार करण्यासाठी राज्यात ५ हजार ७५३ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तर पेगाट्रॉन कॉर्पोरेशन स्मार्टफोनच्या निर्मितीसाठी १ हजार १०० कोटी रूपयांची गुंतवणूक करेल. पेगाट्रॉन ही टप्प्याटप्प्यानं भारतात गुंतवणूक करणार असून ही पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक असेल. भारत गेल्या काही काळापासून फोन असेंबल करणाऱ्या जगातील मोठ्या कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या कंपन्या चीनवर निर्भर राहणं कमी करण्याच्या प्रयत्नतात आहेत. याव्यतिरिक्त कोरोना महासाथ आणि अमेरिका-चीनदरम्यान सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे स्मार्टफोन असेंबल करणाऱ्या अनेक कंपन्या चीनमधून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत. अशातच भारताला अनेक कंपन्या पसंतीही देत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारनं १६ कंपन्यांना प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह प्रोग्राम (पीएलआय) अंतर्गत मंजुरी दिली होती. पेगाट्रॉन कॉर्पोरेशन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक व्यतिरिक्त अन्य कंपन्यादेखील तामिळनाडूत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सन एडिसन तामिळनाडूत ४,६२९ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तसंच या ठिकाणी सोलार पीव्ही मॉड्युल्स तयार करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त ओला इलेक्ट्रिकही राज्यात २,३५४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत इलेक्ट्रीक वाहनं आणि बॅटरी तयार करण्याचा प्रकल्प सुरू करणार आहे. 

टॅग्स :तामिळनाडूटाटाभारतचीनअमेरिकास्मार्टफोन