Join us

जिभेचे चोचले खिशाला लावणार कात्री; गोड पदार्थ महागण्याची शक्यता, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:40 IST

आगामी काळात साखरेचा गोडवा मिळवण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. आतापर्यंत साखरेच्या दरात वाढ झाली असली तरी येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आगामी काळात साखरेचा गोडवा मिळवण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. देशाच्या साखर उत्पादनात झालेली घट हे यामागचं कारण आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे १४ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र येत्या काही दिवसांत कडक उन्हामुळे ऊसाच्या रसची मात्राही कमी होऊ शकते. यामुळे साखर उत्पादनातही घट होऊ शकते. अशा परिस्थितीत देशभरातील बाजारात साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत देशात २१९ लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे. गेल्यावर्षी याच काळात झालेलं उत्पादन २५५ लाख टन इतकं होतं. म्हणजेच यंदा उत्पादन ३६ लाख टन कमी उत्पादन झालं आहे. ऊसाचा पुरवठा बंद झाल्यानं तब्बल १७७ कारखाने आतापर्यंत बंद झाले. गेल्यावर्षी फेब्रुवारीपर्यंत या कारखान्यांची संख्या ६५ इतकी होती.

उष्णतेच्या लाटेचा धोका

त्याचवेळी कडक उन्हामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. साखरेचे दर आधीच साडेसहा टक्क्यांनी वाढले आहेत. एस ग्रेड साखरेचा भाव प्रतिक्विंटल ३८०० रुपयांवर पोहोचलाय. यामुळे येत्या काही महिन्यांत साखर आणखी महाग होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर दिसून पडू शकतो. कारण साखरेची किंमत वाढल्यानं अनेक उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ऊस