Join us

Stock Market: या शेअरची किंमत होणार शून्य, जर तुमच्याकडेही हा स्टॉक असेल तर मिळणार नाही एकही पैसा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 22:18 IST

Stock Market: कर्जामध्ये आकंठ बुडालेली सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेमधून जात आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सिंटेक्स इंडस्ट्रीज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विलीन होणार आहे.

मुंबई - कर्जामध्ये आकंठ बुडालेली सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेमधून जात आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सिंटेक्स इंडस्ट्रीज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विलीन होणार आहे. कारण सिंटेक्सच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सने आरआयएल आणि एसीआरईकडून सादर करण्यात आलेल्या तोडग्याच्या योजनेला मान्यता दिली आहे.

दरम्यान, सिंटेक्स इंडस्ट्रीजने एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, आरआयएल आणि एसीआरईकडून संयुक्तरीत्या आणण्यात आलेल्या तोडग्याच्या योजनेमध्ये प्रस्ताव देण्यात आला की, कंपनीच्या सध्याच्या शेअर कॅपिटलला घटवून शुन्य करण्यात येईल. तसेच कंपनीला बीएसई आणि एनएसईमधून डिलिस्ट करण्यात येईल.

मात्र रिलायन्स इंडस्ट्रिजशी सिंटेक्सचं नाव जोडलं गेल्यावर काही गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली. मात्र एक्स्चेंज फायलिंगमध्ये सिंटेक्स इंडस्ट्रीला बीएसई आणि एनएसईमधून डिलिस्ट केलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोमवारी सिंटेक्स इंडस्ट्रीचे शेअर ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागून ७.८ टक्क्यांवर बंद झाले.

दरम्यान, तुम्हीही सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये पैसे लावले असतील तर तुमची पूर्ण गुंतवणूक शून्य होणार आहे. कारण सिंटेक्स इंडस्ट्रीजचे इक्विटी शेअर हे डिलिस्ट होतील. तसेच दिवाळखोरी प्रक्रियेंतर्गत इक्विटी शुन्य होईल. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडेही सिंटेक्सचे शेअर असतील तर तुम्ही लवकरात लवकर विकून बाजूला होणे उचित ठरणार आहे 

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय