Join us  

Stock Market: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये आज मोठी पडझड; जाणून घ्या यामागची ५ महत्वाची कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 6:12 PM

राज्यासह देशभरात आज दहीहंडीचा सण साजरा होत असला तरी शेअर बाजारात मात्र निराशाजनक वातावरण पाहायला मिळालं. कारण देशांतर्गत शेअर बाजारात मोठा दबाव दिसून आला.

राज्यासह देशभरात आज दहीहंडीचा सण साजरा होत असला तरी शेअर बाजारात मात्र निराशाजनक वातावरण पाहायला मिळालं. कारण देशांतर्गत शेअर बाजारात मोठा दबाव दिसून आला. यामुळे या वर्षातील निफ्टीमधील सर्वात प्रदीर्घ सतत तेजीची वाटचाल आज शेवटच्या ट्रेडिंग सत्रात संपुष्टात आली. BSE सेन्सेक्स ६५१.८५ अंकांनी म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून ५९,६४६.१५ वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी १९८.०५ अंकांनी घसरला आणि १७,७५८.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये ३० पैकी तब्बल २७ शेअर्सचा पडझडीनं शेवट झाला. यापैकी इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांहून अधिक मोठी घसरण पाहायला मिळाली. तर बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स, टाटा स्टील, एसबीआय, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. त्याचवेळी एनटीपीसी लि., महिंद्रा अँड महिंद्रा लि., टायटन आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.

शेअर बाजारात आज एवढी घसरण का पाहायला मिळाली याची ५ कारणं पुढीलप्रमाणे...

१. RIL, BFSI मध्ये विक्रीचं वातावरण: इंडस्ट्री हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय यासारख्या काही प्रमुख बँकांच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली. यामुळे शेअर बाजारावर दबाव वाढला आणि याचा परिणाम पाहायला मिळाला. 

२. डॉलर वधारला: अमेरिकन चलन डॉलरमध्ये रुपयाच्या तुलनेत शुक्रवारी बरीच वाढ झाली आणि इतर चलनांच्या तुलनेत तो एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. डॉलर इंडेक्सचा शेअर बाजाराशी संबंध असतो. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळला की त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळतात. 

३. तांत्रिक दुर्बलता: निफ्टीमध्ये गुरुवारपर्यंत सातत्यानं आठव्या सत्रात वाढ नोंदवण्यात आली होती. यामुळे बुल्स देखील आज बऱ्यापैकी शांत होते. यासोबतच गेल्या काही सत्रात छोट्या-छोट्या इनडिसाइसिव्ह कॅंडल्स पाहायला मिळत होते. त्याचवेळी निफ्टीमध्येही तूट पाहायला मिळाली.  

४. मार्केट व्हॅल्युएशन: गेल्या दीड महिन्यात बाजारात बऱ्यापैकी रिकव्हरी झाली आहे. अशाप्रकारे बाजाराने यावर्षी आतापर्यंतचे सर्व नुकसान मागे टाकलं होतं. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के.विजयकुमार यांच्या माहितीनुसार वाढलेलं मार्केट व्हॅल्युएशन बाजारासाठी पुढे जाण्याच्या मार्गाला न्याय देणारं ठरत नाही. किरकोळ नफा मिळवणं आणि काही पैसे फिक्स्ड इन्कम इंस्ट्रूमेंटमध्ये वळते करणं ही तात्पुरती तरतूद असू शकते.

५. FPI आउटफ्लो: डॉलरमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे इमर्जिंग मार्केटच्या इक्विटीमध्ये FPIs मार्केट शेअर्सवर विक्रीचा दबाव आलेला असू शकतो. गुरुवारी, एफपीआयने निव्वळ आधारावर 1,706 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री नोंदवली होती. 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी