Join us  

आर्थिक सर्वेक्षणापूर्वी शेअर बाजारात उत्साह, सेंसेक्स 40 हजारांजवळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 11:19 AM

देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेत सादर होणार असून, हा अहवाल सादर होण्यापूर्वी शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे.

मुंबई - देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेत सादर होणार असून, हा अहवाल सादर होण्यापूर्वी शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे. आज शेअर बाजारात व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच सेंसेक्समध्ये 75 अंकांनी वाढ होऊन 39 हजार 920 पर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीही सुमारे 30 अंकांनी वधारून 11 हजार 945 वर पोहोचला होता. दरम्यान, बाजारात आलेली तेजी पाहता सेंसेक्स पुन्हा एकदा 40 हजारांचा जादुई आकडा गाठेल, तसेच निफ्टी सुद्धा 12 हजारांच्या वर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नरेंद्र मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळामधील पहिला आर्थिक सर्वेक्षण अहवाल गुरुवारी संसदेत सादर करणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन संसदेमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा संसदेत सादर केला जातो. आर्थिक सर्वे हा अर्थसंकल्पाची नीती आणि दिशा ठरवण्याबाबत कार्य करतो. वित्तमंत्री निर्मला सीतारमन 5 जुलै रोजी लोकसभेमध्ये 2019-20 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, सध्या सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले आहे. सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेवर भर देणार आहे, अशी अपेक्षा गुंतवणुकदारांना आहे. 

टॅग्स :शेअर बाजारअर्थव्यवस्थाकेंद्रीय अर्थसंकल्प 2019