Join us

स्टीलच्या दरामध्ये झाली अडीच हजार रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:48 IST

उद्योग क्षेत्राला बसणार फटका; बांधकामाचे दर वाढण्याने घरेही महागणार

लोकमत न्यूज नेटवर्क  

जालना : गेल्या १५ दिवसांमध्ये राज्यात दमदार पाऊस पडल्याने बांधकामांना गती मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून जालन्यातील स्टीलची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून पंधरा दिवसांमध्ये दरात टनामागे अडीच हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. 

कोरोना काळानंतर फिनिक्स भरारी घेणाऱ्या उद्योगांमध्ये स्टील उद्योगाचा समावेश आहे. कितीही संकटे आली तरी येथील उद्योजकांनी त्यांच्या कामगारांना सांभाळून उत्पादन वाढीत सातत्य ठेवले. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. महिन्याभरापूर्वी स्टील अर्थात घरबांधणीसाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्यांचे दर हे सरासरी ४४ हजार रुपयांवर येऊन ठेपले होते. बुधवारी हे दर सरासरी ४७ हजार ५०० ते ४७ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत.  

बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मध्यंतरी सरकारने मुद्रांक शुल्कच्या दरात कपात केली होती. त्यामुळे घरांची मागणी वाढली आहे. मात्र, आता स्टीलच्या दरात वाढ झाल्यामुळे बांधकामाचा खर्चही वाढणार असून, त्यामुळे घरांच्या किमतींमध्येही वाढ होणार आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना तत्कालीन युती सरकारने वीज  बिलात सवलत दिली होती. ही सवलत प्रतियुनिट जवळपास अडीच रुपये एवढी होती. परंतु, ही सवलत आता सरकारकडून मिळत नसल्याने या उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ही सवलत पुन्हा मिळावी म्हणून आम्ही सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. - योगेश मानधनी, अध्यक्ष, स्टील मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र 

टॅग्स :व्यवसाय