Join us

स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना इशारा! सायबर गुन्हेगारांच्या नवीन ट्रॅपमध्ये अनेकांनी कोट्यवधी गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:01 IST

Cyber Crime : झपाट्याने वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे.

Cyber Crime : सध्या कुणालाही फोन लावल्यानंतर सायबर गुन्हेगारीबाबत दिली जाणारी सूचना ऐकून तुमचेही कान किटले असतील. मात्र, जनजागृतीची किती आवश्यकता आहे, हे दिवसेंदिवस घडणाऱ्या घटनांवरुन स्पष्ट होत आहे. तुम्हाला एखाद्या स्कॅमविषयी माहिती झालं तर गुन्हेगार लगेच दुसरा ट्रॅप आखतात. अशा परिस्थितीत सावध राहणे फार आवश्यक आहे. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडियावरुन नवीन स्कॅमबद्दल माहिती दिली आहे. तुम्हालाही असा कॉल आला तर सावध राहा.

काय आहे प्रकरण?झपाट्याने वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आता थेट पोलीस, सीबीआय सारख्या संस्थांच्या नावाचा वापर केला जात आहे. तुम्हाला बँक अधिकारी, सीबीआय अधिकारी किंवा आयकर विभागाचा अधिकारी म्हणून कॉल करुन धमकावलं जातं. अधिकारी असल्याचं भासवण्यासाठी गणवेश घालून तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात. पाठीमागची पार्श्वभूमीदेखील ऑफिससारखी असते. त्यामुळे अनेकजण या जाळ्यात अडकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियानेही अशा घोटाळ्यांच्या बाबतीत आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने ग्राहकांना नवीन स्कॅमबद्दल इशारा दिला आहे. एसबीआयने म्हटले आहे की फसवणूक करणारे ग्राहकांना सीबीआय किंवा आयकर अधिकारी असल्याचे भासवून धमकावतात. त्यानंतर संवेदनशील माहिती घेऊन आर्थिक फसवणूक केली जाते.

कशी होते फसवणूक?

  • फसवणूक करणारे पहिल्यांदा ग्राहकांना कॉल करतात आणि संभाषणादरम्यान त्यांच्याकडून त्यांचे सर्व महत्त्वाचे तपशील घेतात. 
  • आयकर किंवा प्रशासकीय अधिकारी असल्याचं भासवण्यासाठी गणवेश, ऑफिस अशी सर्व व्यवस्था व्हिडीओ कॉलमधून दाखवली जाते. कारवाई होणार असल्याचं ऐकून ग्राहक घाबरतो. 
  • त्यांतर ग्राहकांकडून केवायसी क्रमांक, पत्ता, आधार कार्ड किंवा पॅन कार्डची माहिती घेतली जाते.

याव्यतिरिक्त, फसवणूक करणारे ग्राहकांच्या कुटुंबाची माहिती गोळा करतात, त्यांना त्यांच्या नावाने कॉल करतात. माझं UPI चालत नाही किंवा पैसे नाहीत म्हणून पैसे मागितले जातात. याव्यतिरिक्त, मालमत्ता खरेदी किंवा विक्री केलेली असेल तर आयकर विभागाच्या नावाने कर भरण्याची नोटीस पाठवली जाते. या युक्तीला ग्राहक बळी पडला तर प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी केली जाते.

घोटाळ्यांपासून कसं राहायचं दूर?

कॉल करणाऱ्या किंवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव नेहमी तपासून घ्या.. अनोळखी कॉलवर बोलू नका.

कोणताही बँक, सीबीआय किंवा प्राप्तिकर अधिकारी तुमच्याकडून फोन, एसएमएस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे गुप्त माहिती विचारत नाही.

जर कोणी तुम्हाला कायदेशीर कारवाई किंवा दंडाची धमकी देत ​​असेल तर सावध रहा.

कोणतेही संशयास्पद कॉल किंवा संदेश आल्यास तुमच्या बँक आणि स्थानिक अधिकाऱ्यांना कळवा.

कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमचे वैयक्तिक तपशील शेअर करू नका. 

टॅग्स :सायबर क्राइमस्टेट बँक आॅफ इंडियाबँकिंग क्षेत्र