Join us  

Adani Group : सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 11:11 AM

Adani Group : सिटी बँक आणि क्रेडिट सूइस सारख्या मोठ्या बँकांनी अदानी समूहाचे बॉण्ड्स कर्जासाठी तारण म्हणून घेण्यास आधीच नकार दिला होता, आता आणखी एका आंतरराष्ट्रीय बँकेने गौतम अदानींना धक्का दिला आहे.

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. जगभरातील बँकांमधीलगौतम अदानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपन्यांच्या पतपुरवठ्यात सातत्याने घट होत आहे. 

सिटी बँक आणि क्रेडिट सूइस सारख्या मोठ्या बँकांनी अदानी समूहाचे बॉण्ड्स कर्जासाठी तारण म्हणून घेण्यास आधीच नकार दिला होता, आता आणखी एका आंतरराष्ट्रीय बँकेने गौतम अदानींना धक्का दिला आहे. एका वृत्तवाहिनीला माहिती देताना, स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीने सांगितले की, त्यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाँड मार्जिन कर्जावर तारण म्हणून घेण्यास नकार दिला आहे. स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाच्या प्रवक्त्याने या रिपोर्टवर भाष्य करण्यास नकार दिला.

दरम्यान, सिटीग्रुप इंक आणि क्रेडिट सुइस ग्रुप एजीने घेतलेल्या अशाच निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, यूएएस आधारित शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने अदानी समूहावर अनेक आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बँकांनी अदानी समूहाचे बाँड आणि सिक्युरिटीज घेण्यास नकार दिला आहे. अदानी समूहाने शॉर्ट सेलरचे आरोप वारंवार फेटाळले आहेत. दुसरीकडे, अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे बाँडधारक आर्थिक सल्लागार आणि वकील यांच्याशी प्राथमिक चर्चा करत आहेत.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर कंपनीने देशातील सर्वात मोठ्या एफपीओवर अचानक बंदी घातली आहे.  ब्लूमबर्ग न्यूजने शनिवारी सांगितले की, कंपनीने किरकोळ इश्यूद्वारे 10 अब्ज रुपये (12.2 कोटी डॉलर) किमतीचे बाँड विकण्याची योजना सध्या टाळली आहे. दरम्यान, हिंडेनबर्गचा रिपोर्टसमोर आल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीचे 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.  

21 जानेवारीनंतर सर्वात मोठी घसरणगौतम अदानी यांच्या संपत्तीत खरी घसरण 21 जानेवारीपासून सुरू झाली. तोपर्यंत हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला नव्हता. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, ज्याकडे सर्वजण सामान्यपणे पाहत होते, परंतु कुणाला काही अंदाज नव्हता की आशियातील सर्वात मोठा उद्योगपती एका मोठ्या कचाट्यात सापडणार आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला आणि अदानींच्या शेअर्सने गटांगळी घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या ट्रेडिंग दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार 3 फेब्रुवारीपर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 59 अब्ज डॉलरवर आली, म्हणजे त्यांची निम्म्याहून अधिक संपत्ती नष्ट झाली आहे. 

150 दिवस आणि दर सेकंदाला 5.77 लाखांचे नुकसानगौतम अदानी यांचे गेल्या 150 दिवसांत मोठे नुकसान झाले आहे. दररोज 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. गौतम अदानी यांना दर तासाला 200 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. गौतम अदानी यांचे दर मिनिटाला साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याची दर सेकंदात विभागणी करायची झाली तर प्रत्येक सेकंदाला 5.77 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसायबँक