आयपीओ बाजारात (IPO Market) सातत्यानं तेजी दिसून येत असून अनेक बड्या कंपन्यांचे इश्यू लाँच होण्याच्या तयारीत आहेत. एक कंपनी अशी आहे ज्यात बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सनी मोठी गुंतवणूक केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन पासून किंग खान शाहरुख खानपर्यंतचा समावेश आहे. ही कंपनी म्हणजे मुंबईतील श्री लोटस डेव्हलपर्स. या कंपनीचा आयपीओ (Sri Lotus Developers IPO) उघडणार आहे. चला जाणून घेऊया त्यासंबंधीचा अधिक तपशील.
७९२ कोटींचा आयपीओ येणार
बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी गुंतवणूक केलेल्या श्री लोटस डेव्हलपर्स अँड रियल्टी लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा आयपीओ ३० जुलै रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. या इश्यूच्या माध्यमातून कंपनीनं बाजारातून ७९२ कोटी रुपये उभे करण्यासह शेअर बाजारात उतरण्याची तयारी केलीये. कंपनी विक्रीसाठी १ रुपयांच्या फेस मूल्याचे शेअर्स ऑफर करेल आणि आयपीओ बंद झाल्यानंतर त्याचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील. मात्र, आयपीओच्या किमतीचा खुलासा कंपनीकडून अद्याप करण्यात आलेला नाही.
आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?
शेअर्स कधी लिस्ट होणार?
श्री लोटस डेव्हलपर्सच्या आयपीओशी संबंधित अधिक तपशील पाहिल्यास हा इश्यू ३० जुलै रोजी उघडल्यानंतर १ ऑगस्टला बंद होईल. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी शेअर्सची वाटप प्रक्रिया होणार असून ५ ऑगस्टपासून गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर क्रेडिटची प्रक्रिया सुरू होणार आहे. कंपनीच्या वतीनं आयपीओ बंद झाल्यानंतर शेअर बाजारात शेअर्सच्या लिस्टिंगसाठी ६ ऑगस्टही संभाव्य तारीख निश्चित करण्यात आली आहे.
शाहरुख अमिताभ यांची किती गुंतवणूक?
रिअल इस्टेट डेव्हलपर आणि चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या नेतृत्वाखालील या रिअल इस्टेट कंपनीत शाहरुख खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर, शाहरुखनं १०.१ कोटी रुपये गुंतवले आहेत, तर बिग बींनी अंदाजे १० कोटी रुपये गुंतवलेत. रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन, अजय देवगण, एकता कपूर, सारा अली खान, टायगर श्रॉफ आणि राजकुमार राव यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनीही यात गुंतवणूक केली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)