Join us  

सणासुदीआधी गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी; आजपासून सरकार सोन्यावर देणार 'इतकी' सूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 9:14 AM

Sovereign Gold Bond Scheme: सॉवरन गोल्ड बॉण्ड योजना २०२०-२१ ला आजपासून सुरुवात

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार सॉवरन गोल्ड बॉण्ड योजना २०२०-२१ सुरू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोनं खरेदी करता येईल. ही गुंतवणूक ८ वर्षांसाठी असेल. पाच वर्षांनंतरही योजनेतून बाहेर पडता येईल. या योजनेच्या माध्यमातून किमान एक ग्रँम ते कमाल चार किलोग्रॅमची गुंतवणूक करता येऊ शकेल.किती रुपयांना मिळणार सोनं?भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, एक ग्रॅम सोन्याची किंमत ५ हजार ५१ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातल्या कामकाजाच्या शेवटच्या तीन दिवसांमधील सोन्याच्या किमतीची सरासरी काढून हा दर निश्चित करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं आरबीआयशी सल्लामसलत करून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीनं पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांना एक ग्रॅम सोन्यासाठी ५ हजार १ रुपये मोजावे लागतील.कुठे आणि कसं मिळणार सोनं?सॉवरन गोल्ड बॉण्ड योजनेच्या माध्यमातून एक व्यक्ती कमाल ४०० ग्रॅम सोनं खरेदी करू शकते. तर किमान गुंतवणूक १ ग्रॅम असणं गरजेचं आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता. योजनेत गुंतवणूक करताना पॅन कार्डचा तपशील देणं गरजेचं आहे. सगळ्या व्यवसायिक बँका (आरआरबी, लघु वित्त आणि पेमेंट बँका सोडून), पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज किंवा थेट एजंटच्या माध्यमातून अर्ज भरता येऊ शकतात.सॉवरन गोल्ड बॉण्ड म्हणजे नेमकं काय?सॉवरन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना थेट सोनं मिळत नाही. त्यांची गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असते. त्यामुळे ती जास्त सुरक्षित असते. या सोन्याच्या शुद्धतेची खात्री असते. तीन वर्षांनंतर या गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स लागतो. पण मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूक कायम ठेवल्यास टॅक्स लागत नाही. कर्ज घेण्यासाठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो. पाच वर्षांनंतर प्रत्यक्षात सोनं मिळवता येतं.सोन्यातली गुंतवणूक फायदेशीर आहे का?ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणतात, सोन्यातील गुंतवणूक ही अजिबात फायदेशीर नाही, कारण सोन्याचे भाव वाढले तरी आपण सोनं काही विकायला जात नाही. नुसते कागदोपत्री भाव वाढून त्याचा काहीही उपयोग नाही, त्यामुळे देशाचंही नुकसान होतं आणि आपलंही नुकसान होतं. तसेच घेतलेलं सोनं विकायला गेल्यानंतर सोनार त्यात काही ना काही घट काढतो, त्यामुळे आपलं नुकसान होतंच. सोन्याचे कागदोपत्री भाव जरूर वाढतात, ते नाकारता येत नाही. पण त्यातून आपल्या हाती किती फायदा येतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. गुंतवणूकदारही सोनं विकत घेतात, पण ते विकत नाही, त्यामुळे त्यातून काहीच फायदा होत नाही. सोन्याचे दर जरी वाढत असले तरी सोनं कोणीही विकत नाही. त्यामुळे काहीही फायदा होत नाही. मात्र, आपण जर बाजारभावाचा उपयोग करून सोनं घेणार असू तर सोन्यासारखी फायदेशीर गुंतवणूक नाही हे मान्य!सोनं १० ग्रॅम म्हणजे १ तोळा हे कसं ठरलं?टिळक म्हणतात, १ तोळा सोनं हे १० ग्रॅम दशमान पद्धतीत बसवणं सोपं जातं. अख्ख्या जगात तशीच पद्धत आहे. १ किलो म्हणजे १००० ग्रॅम असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर निश्चित करणं सोयीस्कर ठरतं, असंही चंद्रशेखर टिळक म्हणाले आहेत.  यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांना विचारलं असता, ते म्हणाले, दोन वर्षांसाठी जर सोन्यात गुंतवणूक केली, तर ती फायदेशीर ठरू शकते. खरेदी आणि विक्रीत प्रत्येक दुकानदाराला मार्जिन ठेवावं लागतं. आज भाव ५१,५०० आहे, जर तुम्ही १०० ग्रॅम सोनं घेतलंत तर त्याचे होतात ५ लाख १५ हजार. हेच जर दोन महिन्यांनी सोनं विकायला आणल्यास ज्वेलर्स हा प्रॉफिट मार्जिन आणि खरेदी-विक्री मार्जिन ठेवूनच विकत घेतो. खऱ्या सोन्यात घट नसते, त्यात बाइंग-सेलिंग मार्जिन असते. डॉलर आणि रुपये असा त्यात फरक असतो, ज्वेलर्स आणि डिलर्स हे दोन प्रकार असतात. डिलर्सकडून सोनं घेतल्यानंतर त्याचे भाव वाढतात, म्हणून एमसीएक्स आणि स्थानिक दरांमध्ये तफावत आढळून येत असते. तसेच जीएसटी लागल्यानं दरांमध्ये फरक पडत असल्याचं सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांनी सांगितलं आहे. मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँड(Sovereign Gold Bond) योजनेंबद्दल विचारले असता ते म्हणाले, आपण उद्याचं नाही सांगू शकत तर सात वर्षं कोण थांबणार, दीर्घकाळासाठी ही योजना फायदेशीर असली तरी कोणीही एवढ्या काळासाठी गुंतवणूक करत नाही.  कसा ठरतो सोन्याचा भाव?डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.

टॅग्स :सोनं