Join us  

म्हणून आली ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी, निर्मला सीतारामन यांनी सांगितले हे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 8:34 PM

ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या मंदीची झळ बसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी काही दिवसांसाठी आपल्याकडील निर्मिती थांबवली आहे.

नवी दिल्ली -  ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या मंदीची झळ बसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी काही दिवसांसाठी आपल्याकडील निर्मिती थांबवली आहे. तसेच या क्षेत्राशी संबंधित असलेल्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीसाठी अजब कारण सांगितले आहे. ओला, उबेरसारख्या टॅक्सी सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद हा कारच्या विक्रीवर प्रभाव पाडत आहे. लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-6 मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे, असे त्यांनी सांगितले. निर्मला सीतारामन म्हणाल्या की,''आजकाल लोकांचा कल हा गाडी खरेदी करून ईएमआय भरण्यापेक्षा मेट्रो तसेच ओला, उबेरमधून प्रवास करण्याकडे वाढला आहे. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात निर्माण झालेली समस्या ही गंभीर आहे. तसेच याच्यावर तोडगा काढला गेला पाहिजे.''निर्मला सीतारामन यांनी पुढे सांगितले की, ''आम्ही सर्वच क्षेत्रामधील समस्यांकडे गांभीर्याने पाहतो. तसेच त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी कटीबद्ध आहोत. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठी आवश्यक त्या घोषणा करण्यात आल्या आहेत तसेच गरजेनुसार अजून काही घोषणा केल्या जातील.''  मात्र मारुतीचे चेअरमन आर.सी. भार्गव यांनी ओला आणि उबेरसारख्या सेवांमुळे कारची विक्री घटल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. तसेच कारच्या घटलेल्या खरेदीकरिता त्यांनी सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरवले होते. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि वाढलेल्या रोड टॅक्समुळेसुद्धा लोक वाहन खरेदी करण्यास कचरत आहेत, असे भार्गव यांनी सांगितले होते.   

टॅग्स :निर्मला सीतारामनवाहनअर्थव्यवस्था