- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सोन्या चांदीच्या दुकानात म्हणजेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या चांदीचा दर आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा दर या दोन्हीमध्ये १५ ते २० टक्क्यांचा फरक पडला आहे. याचा अर्थ २० टक्के प्रीमियम लावून चांदी बाजारात विकली जात आहे. एवढे करूनही सध्या बाजारात चांदी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ऑनलाइनवर जर चांदी विकत घ्यायला जाल तर तिथे एक किलो चांदीसाठी २ लाख ५० हजार रुपये दर दाखवला जात आहे.
कशामुळे वाढला चांदी खरेदीकडे कल? पीएनजी ज्वेलर्सचे सीएमडी डॉ. सौरभ गाडगीळ ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, बाजारात चांदी उपलब्ध नाही. मल्टी कमोडिटी एक्सचेंज व मार्केटमधला भाव दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. चांदीचा पुरवठा नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतील, असेही ते म्हणाले.
भाव वाढल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी होईल, असे आम्हाला वाटत होते. मात्र तशी परिस्थिती नाही. सध्या आम्हीच चांदीचे बुकिंग घेणे बंद केले आहे. कारण ज्यावेळी चांदी हातात येईल त्यावेळी त्याचे भाव काय असतील हे आज आम्ही सांगू शकत नसल्याचेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले.चलनाचे अवमूल्यन, मुद्रावाढ, महागाई यामुळे लोकांचा कल चांदी, सोने खरेदीकडे वाढला आहे. अमेरिका, चीन व्यापार संघर्ष, मध्यपूर्वेतला तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितेमुळे सुद्धा डॉलर आणि रुपये घरात ठेवण्यापेक्षा सोने-चांदी घेतल्यास त्याच्या दरात झपाट्याने वाढ होईल असा मतप्रवाह वाढीस लागल्यामुळेदेखील चांदी खरेदी सुरू आहे.
चांदीचा भाव प्रति १ किलाे
सूत्रांनुसार चांदीचे भाव हे येत्या काळात तीन लाखांच्या पार जातील. आता लोक मोठ्या प्रमाणावर सोने विकून चांदी घेऊ लागले आहेत. बाजारात चांदी उपलब्ध नसल्यामुळे चांदीची ताटे, ग्लास अशा मिळतील त्या वस्तू विकत घेणे सुरू आहे. भाव किती यापेक्षाही मला आज चांदी घ्यायची आहे हा अट्टाहास मार्केटमध्ये सर्वत्र दिसत आहे. मुंबईच्या झवेरी बाजारमध्येही मोठ्या प्रमाणावर लोक चांदी घेताना दिसत आहेत.
बँकेत मिळणारी चांदीही यायला वेळ लागणार
बँकेत येणारी चांदी आकाराने १० किलो, ५० किलो अशी असते. ती एक किलोच्या विटेत परावर्तित करणे किंवा दहा ग्रॅममध्ये बनवणे यालाही काही वेळ लागतो. पण तेवढा वेळही लोक थांबायला सध्या तयार नाहीत, असेही डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले.
चीनदेखील मिळेल त्या दराने घेत आहे चांदी चीनदेखील मिळेल त्या दराने चांदी विकत घेत आहे. कारण सौर पॅनलमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. चांदी बँकिंग म्हणून कुशल विद्युत चालक आहे. चीन सौर ऊर्जा विस्तारात अग्रेसर आहे. शिवाय स्मार्टफोन, सेमीकंडक्टर, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चांदीचे संपर्क आणि सर्किट्स लागतात. चीन हे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक हब आहे. तसेच चीनने प्रदूषण कमी करण्याच्या धोरणावर जास्त भर दिला आहे. यासाठी त्यांना विद्युतीकरण, हरितऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान यासाठी चांदीची मोठ्या प्रमाणावर गरज पडत आहेत. त्यामुळे चीनकडून मिळेल त्या दराने चांदी खरेदी करणे सुरू असल्याचे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे मत आहे.
Web Summary : Silver is unavailable despite a 20% premium. Online rates hit ₹2.5 lakhs per kg amid supply issues and global economic uncertainties. Demand surges due to currency devaluation, inflation, and increased industrial use in China, causing a buying frenzy.
Web Summary : चाँदी 20% प्रीमियम पर भी अनुपलब्ध है। आपूर्ति मुद्दों और वैश्विक आर्थिक अनिश्चितताओं के बीच ऑनलाइन दरें ₹2.5 लाख प्रति किलोग्राम तक पहुंच गईं। मुद्रा अवमूल्यन, मुद्रास्फीति और चीन में बढ़ते औद्योगिक उपयोग के कारण मांग बढ़ी है।