Join us  

चांदीत २ हजारांनी अन् सोन्यात ६०० रुपयांची घट; सुवर्णबाजारात मोठी पडझड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 7:36 AM

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वच व्यवहारावर परिणाम झाल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून या दोन्ही मौल्यवान धातूंनी भावातील उच्चांकी गाठली होती.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीत सुरू असलेली घसरण कायम असून, सुवर्णबाजारात शनिवारी मोठी पडझड झाली. यामध्ये चांदीचे भाव एकाच दिवसात दोन हजारांनी घसरून दर ६९ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आले, तर सोन्याचेही भाव ६०० रुपयांनी कमी होऊन ते ४७ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहेत. कच्च्या तेलातील भाववाढीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची मागणी घटल्याने सोने-चांदीचे भाव कमी होत असल्याचे  सांगितले जात आहे. 

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वच व्यवहारावर परिणाम झाल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून या दोन्ही मौल्यवान धातूंनी भावातील उच्चांकी गाठली होती. त्यानंतर काहीशी घसरण झाली. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंधांदरम्यान सुवर्ण बाजार बंद राहिला तरी कमोडिटी मार्केटमध्ये भाववाढ होत राहिली. आता अनलॉकनंतर काही दिवस भाव चढेच राहिले. मात्र, गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. 

औद्योगिक मागणी कमी

सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम होऊन सोने-चांदीत घसरण होत आहे. तसेच कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर  चांदीची औद्योगिक मागणी कमी झाली असून, त्यामुळे भाव कमी हाेत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. 

कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम होऊन सोने-चांदीचे भाव कमी होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर  चांदीची औद्योगिक मागणीही कमी झाल्याने त्याचाही परिणाम होत आहे. - सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक.

टॅग्स :सोनंचांदी