Join us  

एअर इंडियाच्या अधिग्रहणाचे टाटा उद्योग समूहाकडून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:22 AM

चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी निविदेची शक्यता फेटाळली नाही

मुंबई : टाटा उद्योग समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी बोली लावण्याची शक्यता फेटाळून लावली नाही. ‘एअर इंडियाचे अधिग्रहण करण्याच्या मुद्यावर विचार करा, अशा सूचना मी आपल्या टीमला देईन’, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

एअर इंडिया ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची आहे. प्रचंड तोट्यात असलेली ही हवाई वाहतूक कंपनी विकण्याचा भारत सरकारचा एक प्रयत्न याआधीच फसला आहे. आता सरकारने पुन्हा एकदा ही कंपनी विकण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर टाटा समूहाच्या अध्यक्षांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होते. टाटा समूहाची विस्तारा आणि एअरएशिया या हवाई वाहतूक कंपन्यांत भागीदारी आहे.चंद्रशेखरन यांनी सांगितले की, ‘वास्तविक हा निर्णय (एअर इंडियाच्या खरेदीचा) विस्ताराने घ्यायला हवा. टाटा सन्सने नव्हे. मी तिसरी एअरलाईन चालविणार नाही. आम्ही जोपर्यंत विलीनीकरण करीत नाही, तोपर्यंत प्रश्न आहेच. मात्र, (एअर इंडियाच्या खरेदीबाबत) मी ‘नाही’ म्हणणार नाही, तसेच ‘हो’सुद्धा म्हणणार नाही. मला काहीच माहीत नाही!’गेल्या वर्षी एअर इंडियामधील आपली २४ टक्के हिस्सेदारी कायम ठेवून ७६ टक्के हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. कंपनीत सरकारची हिस्सेदारी कायम राहणार असल्यामुळे खरेदीसाठी कोणीही पुढे आले नव्हते, असे मानले जाते. त्यामुळे आता सरकार एअर इंडियातील सर्व १०० टक्के हिस्सेदारी विकणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या वेळी टाटाने एअर इंडियात कोणताही रस दाखविला नव्हता.चंद्रशेखरन यांनी सांगितले की, ‘आपल्याला आपल्या हवाई वाहतूक व्यवसायासाठी काही तरी उपाय शोधावा लागणार आहे. व्यवसाय वाढविण्याची माझी इच्छा आहे. तथापि, २०२५ पर्यंत हा व्यवसाय तोट्यातच राहणार असल्याचेही मला माहिती आहे.’टाटांचा हवाई वाहतूक व्यवसाय वाढणारच्सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यास टाटा समूहाचा हवाई वाहतूक व्यवसाय वाढू शकतो. टाटांची भागीदारी असलेल्या दोन हवाई वाहतूक कंपन्यांपैकी विस्तारा ही कंपनी ‘फूल-सर्व्हिस एअरलाईन’ असून एअर एशिया ही ‘बजेट कॅरिअर’ आहे. २०१९ मध्ये या दोन्ही कंपन्यांचा एकत्रित तोटा १,५०० कोटी रुपये होता.

टॅग्स :एअर इंडियाटाटा