Join us  

भारतीय कंपन्यांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वात लक्षणीय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 4:29 AM

झिनोव, इंटेल इंडिया यांच्या सर्वेक्षणातील माहिती

नवी दिल्ली : भारतीय कॉर्पोरेट जगतात महिलांचे प्रतिनिधित्व पाच वर्षांत वाढून २१ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर गेले आहे, असे व्यवस्थापन सल्लागार संस्था ‘झिनोव’ने ‘इंटेल इंडिया’च्या साह्याने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. बिगर-तांत्रिक क्षेत्रात महिलांना सर्वाधिक ३१ टक्के प्रतिनिधित्व असून, तांत्रिक क्षेत्रात ते २६ टक्के आहे.

सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व स्थानी मात्र महिलांचे प्रमाण अजूनही कमीच, केवळ ११ टक्के आहे. मध्यम पातळीवरील पदांवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण २० टक्के आहे. कनिष्ठ पातळीवर सर्वाधिक ३८ टक्के महिला आहेत.६० कंपन्यांचा अभ्यास करून हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. यात जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी), तंत्रज्ञान सेवा पुरवठादार आणि स्टार्टअप यांचा समावेश आहे. संघटनात्मक धोरणे आणि पद्धती यांचेही विश्लेषण यात करण्यात आले आहे.

अहवालानुसार, कंपन्यांच्या संचालक मंडळावर २०१२ मध्ये महिलांचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. २०१८ मध्ये ते वाढून १३ टक्के झाले आहे. संचालक मंडळावर किमान एक महिला प्रतिनिधी हवी, असे बंधन घातल्यामुळे ही संख्यावाढ झाली आहे.

मोठ्या कंपन्यांमध्ये ३३ टक्के

अहवालात म्हटले आहे की, मोठ्या कंपन्यांत महिलांना सर्वाधिक ३३ टक्के प्रतिनिधित्व आहे. मध्यम आकाराच्या कंपन्यांत ते २७ टक्के, तर छोट्या कंपन्यांत २१ टक्के आहे. जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांत अर्थात एमएनसी (भारतात अस्तित्व असलेल्या विदेशी कंपन्या) महिलांचे प्रतिनिधत्व २५ टक्के आहे. महिलांचे प्रमाण स्वदेशी ‘एमएनसीं’मध्ये ३० टक्के, तर बिगर एमएनसींमध्ये ३१ टक्के आहे.

टॅग्स :महिलाव्यवसायभारत