Join us
Daily Top 2Weekly Top 5

B1/B2 व्हिसाचा अर्ज एकदा बाद झाल्यास पुन्हा अर्ज करता येतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:59 IST

बहुतांश बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) अर्ज इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याच्या कलम 214(b) अंतर्गत फेटाळले जातात

प्रश्न- मी नुकताच बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी अर्ज केला होता. पण तो रद्द करण्यात आला. मी पुन्हा व्हिसासाठी अर्ज करू शकतो का? तसं असल्यास मी कधी अर्ज करू शकतो?

उत्तर- हो. तुम्ही नॉन इमिग्रंट व्हिसासाठी कधीही अर्ज करू शकता. अमेरिकन इमिग्रेशन कायद्यानुसार, नॉन इमिग्रंट व्हिसासाठी पुन्हा अर्ज करताना वेळेचं कोणतंही बंधन नाही. पुन्हा अर्ज करताना तुम्हाला नवा ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल. याशिवाय नव्याने ऍप्लिकेशन फी भरून वकिलातीमधील अधिकाऱ्याकडे मुलाखतीसाठी हजर राहावं लागेल.

बहुतांश बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) अर्ज इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याच्या कलम 214(b) अंतर्गत फेटाळले जातात. तुम्ही अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य करणार नाही, हे यातून पटवून द्यावं लागतं. त्यासाठी अर्जदाराला अनेक पुरावे द्यावे लागतात. तुम्ही ज्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करत आहात, त्याचसाठी तुम्ही त्याचा वापर कराल आणि अमेरिकेत थोडा काळ वास्तव्य करून माघारी परताल याबद्दल वकिलातीमधील अधिकाऱ्याची खात्री होणं गरजेचं आहे. प्रत्येक अर्जदाराची परिस्थिती वेगळी असते. मात्र व्हिसा प्रक्रियेत अर्जदाराच्या अमेरिकेबाहेरील वैयक्तिक, प्रोफेशनल, आर्थिक गोष्टींचा विचार होतो.  तुम्ही व्हिसासाठी पुन्हा अर्ज केल्यास वकिलातीमधील दुसरा अधिकारी तुमची मुलाखत घेतो. हा अधिकारीदेखील वरील निकषांच्या आधारे तुमच्या अर्जावर विचार करतो. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे सर्व गोष्टींची माहिती द्यावी. तुम्ही तुमच्या अमेरिकेतील प्रवासाबद्दलची योग्य आणि सत्य माहिती दिल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते.

टॅग्स :व्हिसापासपोर्ट