भारतात कर चोरी करणारे एका बाजुला, कर भरणारे एका बाजुला आणि त्या भरलेल्या कराच्या रकमेवर जगणारे एका बाजुला अशी परिस्थिती आहे. या सगळ्यात कर भरणारा जो असतो तो चांगलाच भऱडला जात आहे. अनेकदा भारतातील कर प्रणालीवर करदाते टीका करत असतात. आता बजेटपूर्वीच एका व्यक्तीने उत्पन्नावरील कर भरून देखील कार घ्यायला गेल्यावर भरावा लागणारा ४८ टक्क्यांचा जीएसटी पाहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करत जाब विचारला आहे.
वेंकटेश अल्ला नावाच्या व्यक्तीने एक्सवर अर्थमंत्र्यांना टॅग करत पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने महिंद्राची एक्सयुव्ही ७०० कारचे बिल दाखविले आहे. यात या गाडीवर १४, १४ आणि २० टक्के असा एकूण ४८ टक्क्यांचा टॅक्स आकारला जात असल्याचे म्हटले आहे. या ट्विटवर लोक तुटून पडले असून खुलेपणाने प्रतिक्रिया देत आहेत.
आम्ही आधीच ३१.२ टक्क्यांचा आयकर भरला आहे आणि त्यातून उरलेल्या पैशांतून कार खरेदी करायला गेलो तर तिथेही ४८ टक्के कर लावला जात आहे. हे काय आहे अर्थमंत्री, दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याची काही तरी सीमा आहे का, हे अत्यंत लाजीरवाणे आहे, असे या युजरने म्हटले आहे.
एक्सयुव्ही ७०० ही कार बिलामध्ये १४ लाख रुपयांची दाखविली आहे. तिची कंपनीची मूळ किंमत ही १४ लाख आहे. परंतू ती भरमसाठ कर लादल्यानंतर २१ लाखांवर जात आहे. म्हणजे जवळपास सात लाख रुपयांचा कर घेतला जात आहे. यावरून काही युजरनी एवढेच नाही तर इन्शुरन्सवरही कर आकारला जातो. स्पेअर पार्ट वरही कर आकारला जातो. सर्व्हिसवरही कर आकारला जातो, अशी त्याला आठवण करून दिली आहे.
एवढा कर घेऊनही ही कार कुठून धावणार, तर खड्ड्यांच्या रस्त्यातून, असेही काही युजरनी म्हटले आहे. या व्यक्तीने हा सरकारचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप केला आहे. तसेच भारताला मागे घेऊन जाणारा कर असल्याचेही म्हटले आहे.