Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shopify Inc: "वेळ वाया जातो...आधी मीटिंग घेणं बंद करा", बड्या कंपनीनं घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:20 IST

कॅनाडातील ई-कॉमर्स कंपनी शॉपिफायनं (Shopify Inc) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या वर्षासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली-

कॅनाडातील ई-कॉमर्स कंपनी शॉपिफायनं (Shopify Inc) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या वर्षासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. कंपनीनं आता मीटिंग कल्चरला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ग्रूप मीटिंगपासूनही कर्मचाऱ्यांना दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रिपोर्टनुसार, कंपनीनं निर्णय घेतला आहे की ५० हून अधिक कर्मचाऱ्यांसोबतची मोठी बैठक केवळ गुरुवारच्या दिवशी घेतली जाऊ शकते. त्याशिवाय इतर कोणतीही मीटिंग होणार नाही. तसंच सर्व टीम लीडर्सना देखील कर्मचाऱ्यांना इतर मीटिंग आणि ग्रूप चॅटपासून दूर राहण्यास प्रोत्साहित करण्यास सांगण्यात आलं आहे. 

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टोबी लुत्के यांनी एक ईमेल केला आहे. त्यात "काही गोष्टी नष्ट करण्याऐवजी त्या जोडणं खूप सोपं काम आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी होकार देत असाल तर वास्तवात तुम्ही त्याचवेळी अनेक गोष्टींना नाकारात असता की ज्या त्यावेळेत तुम्ही करण्याचं ठरवलेलं असतं. जस जसं लोक जोडले जातात तसं अनेक नव्या गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचा वेळ मिळाला पाहिजे", असं नमूद करण्यात आलं आहे.  

कंपनीचे उपाध्यक्ष काज नेजतियान यांनी म्हटलं की, कर्मचाऱ्यांना त्यांचा मेकर टाइम परत देणं यामागचा उद्देश आहे. आम्ही दोन पेक्षा अधिक लोकांसोबतच्या सर्व मीटिंग आजपासून रद्द करत आहोत. गेल्या काही वर्षात आम्ही अनेक अशा मीटिंग पाहिल्या आहेत की ज्या जबरदस्तीनं तासंतास लांबवल्या जातात. तसंच कंपनीनं कर्मचाऱ्यांना सोयीस्कर ठरेल अशा ठिकाणाहून काम करण्याचंही स्वातंत्र्य दिलं आहे. 

उत्पादन वाढण्याची शक्यताफ्रान्सच्या NEOMA बिझनेस स्कूलच्या संशोधनानुसार, मीटिंग न केल्यामळे कंपनीच्या पॉलिसी प्रोडक्शनमध्ये वाढ होते. तसंच कर्मचारी कोणत्याही तणावाविना काम करू शकतात. अर्थात शॉपिफायमध्ये मीटिंग्ज पूर्णपणे बंद होणार नाहीत. गेल्या वर्षी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना आपला पगार आणि कन्सेशन स्ट्रक्चर निश्चित करण्याचाही अधिकार दिला होता. तसंच कंपनी सध्या कॉस्ट कटिंगचाही विचार करत आहे.