Join us  

धक्कादायक! पीएमसी बँकेनेच उघडली २१ हजार बनावट खाती, अनेक घोटाळे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:47 AM

रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील अनेक घोटाळे आता उघडकीस येत आहेत.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील अनेक घोटाळे आता उघडकीस येत असून, पोलिसांनी या बँकेविरुद्ध जी तक्रार दाखल केली आहे, त्यात दिलेल्या कर्जाची रक्कम लपवण्यासाठी बँकेने तब्बल २१ हजार बनावट खाती उघडली होती, याचा उल्लेख केला आहे.या बँकेवर निर्बंध घालण्यात आल्याने कोणत्याही खातेधारकाला सहा महिन्यांत केवळ १0 हजार रुपयेच काढता येणार आहे. या बँकेच्या ७ राज्यांत मिळून १३७ शाखा असून, खातेधारकांची संख्या लाखांमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे बँकेचे खातेधारक आणि ज्यांनी त्यात मोठ्या मुदत ठेवी ठेवल्या आहेत, ते हवालदिल झाले आहेत.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार पंजाब अँड महाराष्ट्र बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये थकित कर्जांची रक्कम लपवून ठेवल्याचा उल्लेख आहे. तसेच अनियमितपणे ४३५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचे तक्रारी म्हटले आहे. या तक्रारीनुसार केवळ एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला (एचडीआयएल) आणि त्याच्या समूह कंपन्यांसाठी एकूण कर्जे देण्यात आल्याची माहिती आहे. बँकेने जी एकूण कर्जे दिली आहेत, त्यापैकी ७३ टक्के कर्जे एकट्या एचडीआयएलला मिळाली आहेत.एचडीआयएल कंपनीला बँकेने २५00 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याने या रकमेची वसुली कशी होणार, हा प्रश्नच आहे. ही कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार पीएमसी कंपनीला एनपीएमध्ये (थकित कर्जे) टाकणे गरजेचे होते. ते बँकेने केले नाही. तसेच थकित कर्जासंबंधीची माहितीही पीएमसीने रिझर्व्ह बँकेला दिली नाही.सरव्यवस्थापकांची कबुलीएचडीआयएल कंपनीला एवढे मोठे कर्ज देताना बँकेच्या काही संचालकांना अंधारात ठेवले आणि चेअरमन, चार संचालक व आपण स्वत: यांनी तो निर्णय घेतल्याचे पीएमसी बँंकेचे सरव्यवस्थापक जॉय थॉमस यांनी निर्बंधांनंतर रिझर्व्ह बँकेला कळविले.जॉयऐवजी पोलिसांच्या हाती लागला रिक्षाचालक  मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्टÑ को-आॅपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी प्रमुख आरोपी बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या मागावर आर्थिक गुन्हे शाखा आहे. त्यानुसार कुटुंबीयांकडून त्याच्या मिळालेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलिसांनी शोध सुरू केला. पोलीस तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्या मोबाइलधारकापर्यंत पोहोचलेही. मात्र, जॉयऐवजी त्यांच्या हाती एक रिक्षाचालक लागला. तो या प्रकरणाबाबत अनभिज्ञ असल्याने पोलीसही चक्रावले होते.पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेने थॉमस याच्यासह बँकेचे अध्यक्ष वरियम सिंग, अन्य पदाधिकाऱ्यांसह एचडीआयएलच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. तपासात थॉमस यामागील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागणे महत्त्वाचे आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच तो मोबाइल बंद करून पसार झाला. पोलिसांनी त्याच्या भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयासह वांद्रे येथील एचडीआयएलच्या कार्यालयांमध्ये छापा टाकून झाडाझडती घेतली. घोटाळ्याशी संबंधित कर्ज खात्याचे तपशील, नोंदी, कागदपत्रे आदी साहित्य हस्तगत केले आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत ४४ कर्ज खात्यांभोवती विभागाने तपास केंद्रित केला आहे. या खात्यांशी संबंधित कागदपत्रे विभागाच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले. यापैकी १० खाती एचडीआयएलची असून अन्य ३४ खात्यांचा याच कंपनीशी अप्रत्यक्ष संबंध आहे, असा संशय निर्माण करणारी माहितीही विभागाच्या हाती लागली आहे. त्यात जॉयच्या शोधासाठी पथकाने त्याच्या कुटुंबीयाकडून मोबाइल क्रमांकाची मागणी केली. पोलिसांनी मिळालेल्या मोबाइल क्रमांकावरून तपास सुरू केला. याच तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलीस एका रिक्षाचालकापर्यंत पोहोचले. मात्र या घोटाळ्याशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले. जॉय याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांची पथके सर्व बाजूने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. जॉय पसार झाल्याने अन्य संचालकांचेही धाबे दणाणले आहे. तेदेखील त्याचा शोध घेत असल्याचे समजते.पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत लढा सुरूचमुंबई : पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधांमुळे बँकेत पैसे अडकलेल्या खातेदारांनी पुढील रणनीती ठरविण्यासाठी सायन कोळीवाडा येथील गुरूनानक सभागृहात बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत हजारोंच्या संख्येने खातेदार उपस्थित होते. या बैठकीत पीएमसी बँकेचे संचालक मंडळ व आरबीआयविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पीएमसीच्या खातेदार असलेल्या ११ जणांचे शिष्टमंडळ नेमण्यात आले आहे. खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत हा न्यायालयीन लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत उपस्थितांना विधिज्ञ विवेक पाटील यांनी न्यायालयीन लढ्याविषयी मार्गदर्शन केले. आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासाविषयी माहितीही देण्यात आली. या बैठकीत शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रामसिंग राठोड यांनी सांगितले की, शीख समुदायाने पीएमसी बँकेला आपली बँक समजून खाते उघडले. परंतु बँकेने आमचा विश्वासघात केला. अनेक गुरुद्वारांचे कोट्यवधी रुपये पंजाब अ‍ॅण्ड महाराष्टÑ सहकारी (पीएमसी) बँकेत अडकले आहेत. काही शाखांमध्ये खातेदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून आम्हाला मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, या बैठकीत खातेदार आपल्या समस्या मांडत असताना मोठा गोंधळ निर्माण झाला होता; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.

टॅग्स :पीएमसी बँकभ्रष्टाचारगुन्हेगारी