Join us  

बाजारात घसरण सुरूच; निफ्टी ८३०० च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 2:03 AM

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे जगभरात होत असलेली आर्थिक हानी याचा प्रभाव मुंबई शेअर बाजारावरही दिसून ...

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे जगभरात होत असलेली आर्थिक हानी याचा प्रभाव मुंबई शेअर बाजारावरही दिसून आला. सोमवारी बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने संवेदनशील निर्देशांक १३७५ अंशांनी खाली आला, तर निफ्टी ८३०० अंशांच्या खाली आला. यामुळे बाजारातील घबराट कायम असलेली दिसून येत आहे.

मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक बाजार उघडतानाच सुमारे ५९० अंश खाली येऊन २९,२२६.५५ अंशांवर खुला झाला. त्यानंतर हा निर्देशांक २९,४९७.५७ ते २८,२९०.९९ अंशांदरम्यान वर-खाली होत बाजार बंद होताना २८,४४०.३२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात १३७५.२७ अंश म्हणजेच ४.६१ टक्क्यांनी घट झाली.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा अधिक विस्तृत पायावरील निफ्टी हा निर्देशांकही सोमवारी घसरला. दिवसभरामध्ये हा निर्देशांक ३७९.१५ अंश म्हणजेच ४.३८ टक्क्यांनी घसरून ८,२८१.१० अंशांवर बंद झाला. या निर्देशांकाने ८,३०० अंशांची पातळी सोडल्याने बाजारातील चिंता वाढली आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी, यासाठी विविध उपाय योजले असले तरी अनेक पतमापन संस्थांनी भारताच्या आर्थिक वृद्धीच्या दरामध्ये कपात दाखविली आहे. यामुळे दिवसाच्या उत्तरार्धामध्ये बाजारावर विक्रीचा दबाव अधिकचवाढला. त्यातच आशियामधील शेअर बाजारांमध्येही कोरोनाच्या घबराटीमुळे घट झाली आणि भारतीय बाजारात घसरण झालेली बघावयास मिळाली.

बॅँक समभागांना फटका

बॅँका तसेच वाहन उद्योगाला बाजाराच्या घसरणीमुळे जास्त फटका बसला आहे. बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक १२ टक्क्यांनी घसरले तर त्यानंतर एचडीएफसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बॅँक, कोटक बॅँक आणि मारुती यांना फटका बसल्या दुसऱ्या बाजूला नेस्ले, टेक महिंद्र, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि अ‍ॅक्सिस बॅँक यांचे समभाग वाढले आहेत.

टॅग्स :शेअर बाजारकोरोना वायरस बातम्या