Join us  

Share Market Tips : कोण म्हणतं सामान्य माणूस शेअर बाजारात कमाई करू शकत नाही; गुंतवणूकीपूर्वी फक्त 'या' टीप्स लक्षात ठेवा

By पुष्कर कुलकर्णी | Published: January 12, 2022 12:58 PM

Share Market Tips : या टिप्स आपणास निश्चितच उपयोगी पडतील. आपली गुंतवणूक दीर्घकालीन आहे असे गृहीत धरून या टिप्स आहेत.

डॉ पुष्कर कुलकर्णी

मागील १३ भागांत आपण शेअर बाजारातील विविध संकल्पना (कन्सेप्ट्स) जाणून घेतल्या. बाजारात उतरताना हे सर्व जाणून घ्यावे आणि मगच व्यवहार सुरु करावा. या शेवटच्या भागात तुम्हाला काही टिप्स देणार आहे. या टिप्स आपणास निश्चितच उपयोगी पडतील. आपली गुंतवणूक दीर्घकालीन आहे असे गृहीत धरून या टिप्स आहेत.

१. जितकी क्षमता तितकीच गुंतवणूक - प्रत्येक महिन्याला आपण जितकी रक्कम दीर्घकाळ गुंतवू शकतो तितकीच शेअर बाजारात गुंतवावी. हा कालावधी किमान ५ वर्षे तरी असावा. परंतु  १०, १५ आणि २० वर्षे या  कालावधीसाठी  गुंतवणूक केली तर त्याचे रिटर्न्स हमखास उत्तम मिळतात,

२. निवड - आपल्याला ज्या व्यवसायातील कळते अशा क्षेत्रांतील कंपन्यात गुंतवणूक करावी. शेअर निवडताना कंपनीचा अभ्यास जरूर करावा. कंपनीची गेल्या तीन वर्षातील आर्थिक कामगिरी अवश्य जाणून घ्यावी. फंडामेंटल्सचा योगय अभ्यास केला तर ही माहिती अचूक मिळते आणि नेमक्या कोणत्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये रक्कम गुंतवावी याबाबत निर्णय घेणे सोपे होते. शक्यतो लार्ज कॅप मधील कंपन्या निवडाव्यात. अशा कंपन्या बाजारात जास्त स्थिर राहतात.

३. एंट्री पॉईंट - शेअरचा भाव आकर्षक पातळीवर आहे का याची खातरजमा त्या शेअरचा टेक्निकल अभ्यास करून पाहता येते. निवडलेला शेअर ओव्हर बॉट झोन मध्ये असेल तर काही काळ थांबावे आणि त्या भावात करेक्शन आल्यावर मगच एंट्री करावी. टेक्निकल मधील RSI चार्ट यासाठी उपयुक्त टूल आहे.

४. ऋण काढून सण नको - उधार पैशांवर कधीही  शेअर खरेदी करू नयेत. म्हणजेच ब्रोकर कडून दिलेल्या मार्जिन वर आणि बाहेरील वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर शेअर्स अजिबात खरेदी करू नका.

५. विविध क्षेत्र (सेक्टर्स) - आपल्या पोर्टफोलिओ मध्ये एकाच सेक्टर मधील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू नका. यामुळे धोका वाढतो. विविध सेक्टर्स जसे केमिकल, ऑटोमोबाईल, एफ एम जी सी, बँकिंग, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्स, पेंट्स, कम्युनिकेशन, सॉफ्टवेअर, रिअल इस्टेट, फार्मा, ऑइल, ऍग्रीकल्चर इत्यादी. क्षेत्र निवडताना त्या क्षेत्राचा पुढील विकास आणि वाढ याचा अभ्यास करावा जेणेकरून गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळेल.

६. रिव्ह्यू आवश्यक - गुंतविलेल्या पैशांचा योग्य मोबदला मिळण्यासाठी ज्या शेअर्समध्ये रक्कम गुंतविली आहे त्या कंपन्यांची कामगिरी चांगली आहे ना? याचा रिव्ह्यू तिमाही आणि वार्षिक निकाल पाहून घेणे आवश्यक आहे.

७. योग्य वेळी एक्झिट - गुंतविलेल्या कंपनीची कामगिरी योग्य नसल्यास वेळीच  ते शेअर्स विकून दुसऱ्या चांगल्या कंपनीत गुंतविणे आवश्यक असते. अशा वेळेस तोटा सहन करून बाहेर पडणे ही व्यवहार्य ठरते

८. चिकाटी, सातत्य आणि ध्येर्य - चांगला परतावा मिळविण्यासाठी आपल्यात सातत्य, चिकाटी आणि ध्येर्य या गुणांची आवश्यकता असणे आवश्यक आहे.

९. संधी - बाजारात नवनवीन कंपन्या येतात आणि आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवितात. अशा कंपन्या कोणत्या आहेत त्या हेराव्यात आणि जर आयपीओ द्वारे संधी मिळाल्यास अवश्य गुंतवणूक करावी. जर आयपीओमधून शेअर्स नाही अलॉट झाले, तर शेअर लिस्ट झाल्यानंतर भवपातळी पाहून योग्य संधी मिळाल्यास गुंतवणूक करावी. 

१०. पेनी स्टॉक - कमी किमतीचा ज्याला इंग्रजीत पेनी स्टॉक म्हणतात असे शेअर्स  गुंतवणुकीसाठी म्हणजे उत्तम असे मुळीच नाही. भाव अधिक असला तरी कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करीत असेल अशाच कंपनीच्या शेअर्स मध्ये रक्कम गुंतवावी.

११. भावना आणि व्यवहार - शेअर बाजार हा जरी सेंटीमेंट्सवर चालत असला तरी भावनिक व्यवहार नसावा. गुंतवणुकीत नेहमीच व्यवहारी विचार असावा.

१२. सेट द गोल्स  - आपली आर्थिक उद्दिष्ट ठरवून घ्या आणि त्यानुसार गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करा. उदा. मुलांचे उच्च शिक्षण, मुलीचे लग्न, विदेश सहल, रिटायमेन्ट प्लॅन इत्यादी.

१३. अफवांवर विश्वास ठेऊ नका. बाजारात ऑपरेटर सक्रिय असतात आणि बहुतांशी तेच वेगवेगळ्या बातम्या पसरवून शेअरचे भाव खाली किंवा वर नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे बाजारातील अफवा पसरविणाऱ्या बातम्यांची योग्य पद्धतीने खातरजमा करून घ्यावी.

१४. ग्रीड आणि फिअर : बाजारात जेव्हा अती हव्यास असतो म्हणजेच ग्रीड असते तेव्हा वाढीव भावात विक्रीची संधी असते. आणि जेव्हा कोणत्याही कारणाने बाजारात भीती म्हणजेच फिअर / पॅनिक असतो तेव्हा खालच्या भावात फंडामेंटल्स चांगले असलेल्या शेअर्स मध्ये दीर्घ कालीन गुंतवणुकीची संधी असते.

१५. शेअर बाजाराचे तंत्र योग्य पद्धतीने जाणून घेऊन कमी वयातच दीर्घकालीन गुंतवणूक सुरु करा आणि आपला फिनान्शिअल फ्रिडम सुनिश्चित करा.हेही वाचा

स्मॉल, मीडियम, लार्ज कॅप ऐकलंय?, माहितीये कॅपिटल गेन वर किती टॅक्स लागतो?, वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं 

गुंतवणूकदारांचे चार प्रकार अन् त्यांच्या खरेदी-विक्रीवर ठरणारे शेअर बाजाराचे चढ-उतार... जाणून घ्या!

IPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा! ​​​​​​​

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक