Join us  

बाजार लाल; कमावले ते सर्व बुडाले; १ महिन्यात तब्बल १० टक्के घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 7:25 AM

बाजारातील घसरणीचा फटका भक्कम समजल्या जाणाऱ्या कंपन्यांनाही बसला असून, हातावर मोजण्या इतक्या कंपन्या सोडल्या तर सर्वच कंपन्यांचे समभाग एक महिन्यात जवळपास १० ते १५ टक्क्यांनी कोसळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेअर बाजार घसरणीचे सत्र दोन महिन्यांपासून कायम असून, या दरम्यान शेअर बाजारात १० टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. यामुळे शेअर बाजार ६२ हजार २४५ या उच्चांकी पातळीवरून खाली येत ५३ हजारांच्या पातळीवर घसरला आहे. ही घसरण तब्बल ९ हजार ३१५ अंकांनी झाली आहे. यामुळे केवळ १ महिन्यात गुंतवणूकदारांचे तब्बल ३० लाख कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले असून, कंपन्यांचे बाजार भांडवलही  कमी झाले आहे.

बाजारातील घसरणीचा फटका भक्कम समजल्या जाणाऱ्या कंपन्यांनाही बसला असून, हातावर मोजण्या इतक्या कंपन्या सोडल्या तर सर्वच कंपन्यांचे समभाग एक महिन्यात जवळपास १० ते १५ टक्क्यांनी कोसळले आहेत. जगभरातील सर्वच देशांमध्ये महागाई वाढत असल्याने हा परिणाम जाणवत असून, येत्या काळातही शेअर बाजारातील घसरण सुरूच राहण्याचा इशारा बाजार तज्ज्ञांनी दिला आहे.

कंपन्यांनी फायद्याऐवजी दिला तोटाn वर्ष २०२२ मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान निफ्टी ५० मधील ३७ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना फायद्याऐवजी तोट्यात टाकले आहे. n निफ्टी १०० पैकी ६७ कंपन्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे, तर निफ्टी स्मॉलकॅपच्या प्रमुख १०० कंपन्यांमधील तब्बल ७४ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना तोटा दिला आहे. n त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणूक थांबवीत म्युच्युअल फंड व एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू केली आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?सध्याच्या काळात अतिलोभ टाळायला हवा. लोभाच्या नादात कमकुवत समभाग घ्याल, तर फसाल. दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेले अनेक समभाग अभ्यास करत हळूहळू पोर्टफोलिओमध्ये जोडत राहा.

फुगा फुटणार? १ एप्रिल २०२० पासून ते १९ ॲाक्टोबर २०२१ पर्यंत शेअर बाजाराने अभूतपूर्व अशी वाढ केली आहे. 

१ एप्रिल २०२० रोजी २८,२६५ वर असणारा शेअर बाजाराचा निर्देशांक १९ ॲाक्टोबर २०२१ मध्ये ६१ हजार ३०५ या पातळीवर गेला होता. त्यामुळे सध्या शेअर बाजार ओव्हर व्हॅल्यूड असून, त्याचा फुगा फुटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शेअर बाजार