Join us  

share market : कोरोनाच्या भीतीने बाजार खाली, निकालांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 1:07 AM

share market : मुंबई शेअर बाजार खुला झाला तोच काहीसा खाली येऊन. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ५०,११८.०८ ते ४८,५८०.८० अंशांदरम्यान खाली वर होत राहिला. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजारात नफा कमविण्यासाठी मोठी विक्री झाल्याने निर्देशांक खाली आले.

- प्रसाद गो. जोशी

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे स्वागत केल्यानंतर कोणतीही निश्चित दिशा नसलेल्या बाजाराला कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची चिंता वाटू लागली . त्यामुळे बाजार उत्तरार्धात घसरला. ही घसरण मोठी असल्याने सप्ताहाचा विचार करता निर्देशांक खाली आले. मात्र, मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मात्र वाढ झालेली दिसून आली. मुंबई शेअर बाजार खुला झाला तोच काहीसा खाली येऊन. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ५०,११८.०८ ते ४८,५८०.८० अंशांदरम्यान खाली वर होत राहिला. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजारात नफा कमविण्यासाठी मोठी विक्री झाल्याने निर्देशांक खाली आले. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली. काही समभागांमध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली.दरम्यान, परकीय वित्त संस्थांनी चालू महिन्यामध्ये बाजारातून पैसे काढून घेणे सुरू ठेवले आहे. या संस्थांनी आतापर्यंत ९२९ कोटी रुपये काढून घेतले आहेत. कोरोनामुळे काही प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा धसका या संस्थांनी घेतल्याने नफा कमविण्याचे धोरण त्यांनी कायम राखलेले दिसून येते. 

निकालांकडे लक्षविविध कंपन्यांचे तिमाही निकाल आगामी सप्ताहापासून जाहीर होऊ लागतील. त्याकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची भीती यावरही बाजाराचे बारीक लक्ष असेल. त्याचप्रमाणे अमेरिकेने दिलेले प्रोत्साहन पॅकेज तसेच युरोप व आशियातील देशांमधील शेअर बाजाराची वाटचाल यावरच बाजाराची आगामी कालातील वाटचाल बरीचशी अवलंबून असेल.

भांडवलमूल्य वाढले १.१४ लाख कोटींनी- गतसप्ताहामध्ये अव्वल दहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यांमध्ये वाढ झाली आहे. टीसीएस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलीव्हर आणि भारती एअरटेल या चार कंपन्यांचे भांडवलमूल्य वाढले आहे. अन्य सहा कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये घट झाली आहे. - गतसप्ताहात दहा अव्वल कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये १.१४ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. सहा कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य कमी झाले असले तरी वाढलेल्या मूल्यापेक्षा ते कमीच असल्याने एकूण कंपन्यांचे मूल्य वाढले आहे. या पहिल्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आपला पहिला क्रमांक राखून आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक आहेत. 

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार