शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारास पूर्वी ब्रोकरद्वारे अतिरिक्त मार्जिन दिले जात असे. यावर डिलिव्हरी, इंट्रा डे ट्रेड करता येत असे. परंतु सेबीच्या नवीन नियमानुसार ब्रोकरद्वारे अतिरिक्त मार्जिन फक्त शेअर्स प्लेज ठेवूनच घेता येते.
प्लेजिंग म्हणजे? : जसे सोने गहाण ठेवून आपण कर्ज घेतो तसे आपल्याकडील असलेले शेअर्स ब्रोकरच्या माध्यमातून गहाण ठेवून ट्रेडिंगसाठी अतिरिक्त रकमेचे मार्जिन मिळविणे म्हणजे प्लेजिंग. डिलिव्हरी ट्रेडसाठी या मार्जिनचा वापर मात्र करता येत नाही.
रिस्क कोणती?0 जी रक्कम अतिरिक्त मिळते ती आपली स्वतःची नसते. उधार म्हणून मिळालेली असते. जर इंट्रा डेमध्ये तोटा झाला तर तितकी रक्कम भरावी लागते.0 तोटा भरून काढण्यासाठी पुन्हा इंट्रा डे व्यवहार या चक्रात अडकण्याची मोठी शक्यता असते.0 जर तोटा झाला आणि तो भरण्यासाठी पैसे नसतील तर खात्यातील शेअर्स विकून पैसे भरावे लागतात. शेअर्स विकताना ते तोट्यात असतील तर अधिक नुकसान होते.
प्लेजिंगचे फायदे काय? आपल्याच शेअर्सवर इंट्रा डेसाठी अतिरिक्त फंड्स / मार्जिन उपलब्ध होणे.या मार्जिनवर इंट्रा डे ट्रेड करून शेअर बाजारातून फायदा मिळविता येऊ शकतो.
का टाळावा प्लेजिंगचा मोह?0 पूर्वीपासून आपल्याकडे एक म्हण आहे. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’. या म्हणीनुसार आपल्याकडे जितके पैसे आहेत तितकेच ट्रेडिंगसाठी लावावेत. 0 उधारीवर कधीही ट्रेड करू नये. यात होणारे नुकसान भरून तर काढणे अवघड असते आणि असलेली गंगाजळी कमी होण्याची शक्यता अधिक असते. 0 सुजाण गुंतवणूकदाराने दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा आणि मार्जिन घेऊन ट्रेड करण्याचे टाळावे. यातच खरी अर्थ ‘बाजार’ नीती आहे.