Join us  

Shaadi, Naukri, 99acres... प्ले स्टोअरनं हटवली डझनभर Apps, फाऊंडर्स म्हणाले, "ही तर गुगलची..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 9:33 AM

गुगलने अनेक लोकप्रिय ॲप्स प्ले स्टोअरवरून हटवली आहेत. यामध्ये शादी, नौकरी, 99acres, STAGEdotin आणि Matrimony यासह सुमारे डझनभर ॲप्सचा समावेश आहे.

गुगलने अनेक लोकप्रिय ॲप्स प्ले स्टोअरवरून हटवली आहेत. यामध्ये शादी, नौकरी, 99acres, STAGEdotin आणि Matrimony यासह सुमारे डझनभर ॲप्सचा समावेश आहे. गुगलच्या या कारवाईवर कंपन्यांच्या फाऊंडर्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गुगलनं आपली ॲप्स अशा प्रकारे काढून टाकल्यानं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. 

शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल यांनी हा दिवस भारतीय इंटरनेटसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी गुगलला 'न्यू डिजिटल ईस्ट इंडिया' कंपनी असंही म्हटलंय. गुगलनं आपल्या ॲप बिलिंग धोरणाची अंमलबजावणी न करणारी १० भारतीय ॲप्स आपल्या प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय घेतलाय. ॲप्सवरील कारवाईचं हेच कारण आहे.  

इंटरनेट आणि मोबाईल कंपन्यांची संघटना IAMAI हीदेखील या प्रकरणी पुढे आली आहे. त्यांनी गुगलला कडक अॅडव्हायझरी जारी केली आहे. संस्थेनं गुगलला प्ले स्टोअरवरून भारतीय ॲप्स काढून टाकणं बंद करण्याचं आवाहन केलंय. 

इन्फो एजचे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनी, Google नं हे पाऊल भारतीय डेव्हलपर्ससाठी ॲप बिलिंग धोरण लागू करण्यासाठी उचललं असल्याची प्रतिक्रिया दिली. गुगलच्या ॲप पॉलिसीविरुद्धच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर ९ फेब्रुवारीपासून इन्फो एजचे नौकरी आणि 99acres ॲप्स Google च्या ॲप धोरणाचे पालन करत होते. असं असूनही, ते गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) काढून टाकण्यात आल्याचे ते म्हणाले. 

काय म्हणाले अनुपम मित्तल? 

आजचा दिवस भारतीय इंटरनेटसाठी काळा दिवस आहे. गुगलनं आपल्या ॲप स्टोअरमधून प्रमुख ॲप्स काढून टाकली आहेत. भारतीय स्पर्धा आयोग (CCI) आणि सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे ही दुसरी बाब आहे. गुगलचं खोटं नरेशन हे दर्शवितं की त्यांना भारताबद्दल फारसा आदर नाही. ही नवी डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी आहे. हे थांबवायला हवं, असं अनुपम मित्तल म्हणाले. 

कोणत्याही इशाऱ्याशिवाय कारवाई 

Google नं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ॲप हटवल्यानं आश्चर्य वाटत आहे. न्यायालयात खटलास प्रलंबित असूनही, गुगलच्या कठोर रणनितीमुळे, त्यांच्या मनमानी धोरणांचं पालन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही, अशी प्रतिक्रिया डेटिंग ॲप QuackQuackin चे संस्थापक आणि सीईओ रवी मित्तल यांनी दिली. 

आपला बहुतांश युजरबेस अँड्रॉइडवर आहे. जिथे दररोज २५ हजारांपेक्षा जास्त डाउनलोड होतात. अँड्रॉइड इकोसिस्टममध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कंपनीसाठी Google Play Store हा एकमेव पर्याय आहे. यामुळे केवळ आमचं ॲपच नाही तर संपूर्ण स्टार्टअप इकोसिस्टम धोक्यात येते, असंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी भारत सरकारला हस्तक्षेप करून निष्पक्ष स्पर्धेचे संरक्षण करण्याचं आवाहन केले आहे. 

काय आहे प्रकरण? 

गुगलच्या वतीने शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं की, ॲप विकासकांना गुगलच्या बिलिंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. या काळात विकासकांनी अंमलबजावणीसाठी आवश्यक व्यवस्था केली नाही. त्यानंतर विकासकांना वाढीव मुदतही देण्यात आली होती. तिचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता असे १० ॲप्स प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

टॅग्स :गुगलव्यवसाय