Join us  

6 दिवस अन् ₹76000 कोटींची कमाई... LIC-Reliance च्या गुंतवणूकदारांना बंपर फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 8:40 PM

Sensex Top-10 Firms: मागील आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार मूल्यात 1.47 लाख कोटींची वाढ झाली.

Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मागील आठवडा अतिशय चांगला ठरला. BSE च्या टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणावर वाढले. विशेष म्हणजे, यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सर्वाधिक वाढ झाली. या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला. या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना अवघ्या 6 दिवसांत 76000 कोटी रुपयांहून अधिकचा नफा झाला.

8 कंपन्या नफ्यात गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप 1,47,935.19 कोटी रुपयांनी वाढले. कंपन्यांनी केलेल्या नफ्यामुळे सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये 1,341.47 अंक किंवा 1.84 टक्के वाढ नोंदवली. विशेष म्हणजे, 18 मे रोजी इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागामध्ये विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते.

मुकेश अंबानींची दमदार कमाईगेल्या आठवड्यात ज्या आठ कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले, त्यात देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आघाडीवर होती. कंपनीचे मार्केट कॅप 6,16,212.90 कोटी रुपयांवर पोहोचले. तर, LIC च्या गुंतवणूकदारांनी अवघ्या सहा दिवसांत 40,163.73 कोटी रुपयांची कमाई केली. दुसरीकडे, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर राहिली. गेल्या आठवड्यात अंबानींच्या कंपनीच्या भागधारकांची संपत्ती 36,467.26 कोटी रुपयांनी वाढली. तसेच, रिलायन्सचा एमकॅप 19,41,110.70 कोटी रुपयांवर पोहचले.

रिलायन्स आणि एलआयसी नंतर गुंतवणूकदारांना फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर भारती एअरटेलचे होती. कंपनीचे बाजार मूल्य 26,492.61 कोटी रुपयांनी वाढून 7,64,917.29 कोटी रुपये झाले. याशिवाय सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीचे बाजार मूल्य 21,136.71 कोटी रुपयांनी वाढून 11,14,163.29 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले. तर, आयसीआयसीआय बाजार मूल्य 9,570.68 कोटी रुपयांनी वाढून 7,94,404.51 कोटी रुपये झाले, इन्फोसिसचे बाजार मूल्य 7,815.51 कोटी रुपयांनी वाढून 5,99,376.39 कोटी रुपये झाले. तर SBI चे बाजार मूल्य रु. 2,231.15 कोटींनी वाढून 7,32,576.77 कोटी रुपयांवर आले.

टाटाचे नुकसान एकीकडे आठ कंपन्यांच्या संपत्तीत वाढ होत असतानाच, दोन कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला. सर्वात मोठा तोटा टाटा समूहाच्या टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला बसला. TCS चे मार्केट कॅप 16,588.94 कोटी रुपयांनी घसरून 13,92,963.69 कोटी रुपयांवर आले. याशिवाय, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे बाजार मूल्य 6,978.29 कोटी रुपयांनी घसरुन 5,46,843.87 कोटी रुपयांवर आले.

(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक