मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, युद्ध आणि महाग मूल्यांकनाच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव असतानाही ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅन्लेने भारताबाबत मोठा आशावाद व्यक्त केला आहे. पुढील वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था नव्या वाढीच्या टप्प्यात प्रवेश करेल आणि त्यामुळे सेन्सेक्स जून २०२७ पर्यंत ८९ हजारांवर पोहोचू शकतो, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
सध्याच्या पातळीच्या तुलनेत हा १५ टक्क्यांचा संभाव्य वाढीचा अंदाज आहे. हा अहवाल समोर येताच गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शेअर बाजारात ७८९ अंकांची उसळी पाहायला मिळाली.
भारतीय बाजार सध्या ६ तिमाहीच्या संथ कमाईच्या टप्प्यातून बाहेर पडत असून, एका मजबूत विकास चक्रात प्रवेश करीत आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
कंपन्यांच्या नफ्यात सरासरी १६ टक्के वाढ
मागणी मजबूत राहील, जागतिक अर्थव्यवस्था स्थिर वाढ नोंदवेल आणि कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीपेक्षा कमी राहतील.
या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांच्या नफ्यात आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत दरवर्षी सरासरी १६ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तेलाच्या धोक्याकडेही लक्ष
भारताच्या आयातीत कच्च्या तेलावर मोठे अवलंबित्व कायम असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व पूर्वीपेक्षा कमी झाले असल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने म्हटले आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीतील धक्क्यांचा परिणाम पूर्वीइतका तीव्र राहणार नाही.
एआयने भारतीय आयटी कंपन्यांना मोठी संधी
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल परिवर्तनाच्या जागतिक लाटेमुळे भारतीय आयटी सेवा कंपन्यांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.
३ महत्त्वाचे अंदाज कोणते?
मूळ स्थिती (५०% शक्य)
देशांतर्गत मजबूत वाढ, कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यास सेन्सेक्स ८९,००० वर जाईल. या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांच्या नफ्यात आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत दरवर्षी सरासरी १६ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
तेजी (२५% शक्य)
कच्चे तेल प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली आल्यास धोरणांना गती मिळेल. शिवाय, कमाईचा वेग वाढल्यास सेन्सेक्स थेट १,००,००० अंकांची ऐतिहासिक पातळी ओलांडू शकतो. यात कंपन्यांच्या नफ्यात १९ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
मंदी (२५% शक्य)
कच्चे तेल प्रति बॅरल १२० डॉलरच्या पार गेले, जागतिक विकास दर घसरला व आरबीआयने व्याजदर कडक केले, तर सेन्सेक्स ६६,००० पर्यंत घसरू शकतो. अशात बाजारमूल्यांकनावर दबाव येऊन कंपन्यांच्या नफ्याची वाढ मंदावू शकते.
Web Summary : Morgan Stanley forecasts Sensex reaching 89,000 by June 2027, a 15% rise. Strong domestic growth and stable global economy are key factors. However, high oil prices could cause a fall.
Web Summary : मॉर्गन स्टैनली का अनुमान है कि सेंसेक्स जून 2027 तक 89,000 तक पहुंच जाएगा, जो 15% की वृद्धि है। मजबूत घरेलू विकास और स्थिर वैश्विक अर्थव्यवस्था प्रमुख कारक हैं। हालांकि, उच्च तेल की कीमतें गिरावट का कारण बन सकती हैं।