Join us  

एका मिनिटात ४ लाख कोटी स्वाहा; येस बँक, कोरोनामुळे शेअर बाजार गडगडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 10:07 AM

सेन्सेक्स १४०० अंकांनी घसरला; निफ्टीत ३ टक्क्यांची घसरण

मुंबई: कोरोनाचं थैमान आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं येस बँकेवर घातलेले निर्बंध याचा मोठा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात, अशी भीती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली. त्यानंतर अमेरिकेन शेअर बाजाराचानिर्देशांकात घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही पाहायला मिळाला. सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला, तर निफ्टी ४०० अंकांनी खाली आला. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. जवळपास ८० देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. याचा परिणाम जगातल्या महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये दिसू लागला आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (BSE, NSE) सकाळच्या सुमारास मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात उलाढाल सुरू होताच सेन्सेक्स ८५६.६५ अंकांनी घसरला. पुढे सेन्सेक्स १,४५० अंकांनी खाली गेला. तर निफ्टीमध्ये ३ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. जगभरात कोरोनामुळे शेअर बाजारात पडझड होत असताना भारतीय शेअर बाजारांना दुहेरी फटका बसला. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काल निर्बंध घातले. त्याचा परिणाम शेअर बाजाराचं कामकाज सुरू होताच दिसला. येस बँकेचा शेअर तब्बल ३० टक्क्यांनी घसरला. याशिवाय इतरही शेअर्स घसरले.शेअर बाजार सुरू होताच अवघ्या एका मिनिटात गुंतवणूकदारांचं ४ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. सुरुवातीलाच सेन्सेक्स १२३०० अंकांपर्यंत घसरला. सकाळी साडे नऊच्या सुमारास जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर कोसळले होते. एसबीआय, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा यासह अनेक कंपन्यांच्या शेअर्सला जागतिक परिस्थितीचा फटका बसला. केवळ हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर्स चांगली कामगिरी करताना दिसत होता. 

टॅग्स :कोरोनानिर्देशांकशेअर बाजारअमेरिकाडोनाल्ड ट्रम्प