Join us

सेन्सेक्स आणि निफ्टी आपटले; गाठला तीन आठवड्यांचा नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 23:49 IST

जागतिक पातळीवरील व्यापारी युद्धाचा धोका पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजार आपटले.

मुंबई : जागतिक पातळीवरील व्यापारी युद्धाचा धोका पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजार आपटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६७.६५ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५१ अंकांनी खाली आला. दोन्ही निर्देशांक तीन आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचले आहेत. भारताच्या चालू खात्यातील तूट वाढल्याचा परिणामही बाजारावर दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले.भारताच्या चालू खात्यातील तूट (कॅड) एप्रिल-जूनच्या तिमाहीत वाढून १५.८ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती १५ अब्ज डॉलर होती. कॅडमधील वाढीला भारताच्या विदेश व्यापारातील वाढती तूट कारणीभूत असल्याचे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण ही आणखी काही कारणे आजच्या घसरणीमागे आहेत, असे बाजाराशी संबंधित सूत्रांनी सांगितले.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६७.६५ अंकांनी घसरून ३७,९२२.१७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५१ अंकांनी घसरून ११,४३८.१0 अंकांवर बंद झाला. हा निर्देशांकांचा तीन आठवड्यांचा नीचांक ठरला आहे. ही सेन्सेक्सची १६ मार्चनंतरची सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली आहे, तसेच निफ्टीची ६ फेब्रुवारीनंतरची सर्वांत मोठी घसरण ठरली आहे.सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, वेदांता, इंडसइंड बँक, एशियन पेंट, ओएनजीसी, बजाज आॅटो, एचयूएल, कोटक बँक, अदानी पोर्टस्, हीरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एलअँडटी, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरले. याउलट अ‍ॅक्सिस बँक, विप्रो, येस बँक, टीसीएस आदींचे समभाग वाढले.

टॅग्स :शेअर बाजार