Join us

अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 14:52 IST

Reliance home finance ltd share price: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स हे शेअर्स सध्या ट्रेडिंगसाठी बंद आहेत. कंपनीचा शेअर ४.२८ रुपयांवर बंद झाला होता.

Reliance home finance ltd share price: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्सचे शेअर्स सध्या ट्रेडिंगसाठी बंद आहेत. कंपनीचा शेअर ४.२८ रुपयांवर बंद झाला होता. याची अखेरची बंद किंमत २८ ऑक्टोबर रोजीची आहे. तेव्हापासून शेअरमध्ये ट्रेडिंग बंद आहे. बाजार नियामक सेबीनं बुधवारी रिलायन्स होम फायनान्सच्या प्रमोटर युनिटसह सहा युनिट्सना नोटीस बजावून १५४.५० कोटी रुपये भरण्यास सांगितलं. निधीच्या गैरव्यवहारासंदर्भात कंपनीला ही नोटीस देण्यात आली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) या कंपन्यांना १५ दिवसांच्या आत पैसे भरण्यास सांगितले आहे. तसं न केल्यास मालमत्ता आणि बँक खाती जप्त केली जातील.

काय आहे सविस्तर माहिती?

क्रेस्ट लॉजिस्टिक्स अँड इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत (आताची सीएलई प्रायव्हेट लिमिटेड), रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स एक्स्चेंज नेक्स्ट लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, रिलायन्स बिझनेस ब्रॉडकास्ट न्यूज होल्डिंग्स लिमिटेड आणि रिलायन्स क्लीनजेन लि. समाविष्ट आहे. या युनिट्सनी दंड न भरल्यानं डिमांड नोटीस आली आहे. नियामकानं सहा वेगवेगळ्या नोटीसमध्ये या संस्थांना प्रत्येकी २५.७५ कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत. यात व्याज आणि वसुली खर्चाचा समावेश आहे.

थकबाकी न भरल्यास नियामक या संस्थांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून आणि विकून रक्कम वसूल करेल. याशिवाय त्यांची बँक खात्यांवरही जप्ती आणली जाईल. या वर्षी ऑगस्टमध्ये सेबीने उद्योगपती अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्सचे माजी प्रमुख अधिकारी आणि इतर २४ संस्थांवर सिक्युरिटीज मार्केटमधून पाच वर्षांची बंदी घातली होती.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीव्यवसाय