Join us

SEBI चा मोठा निर्णय! आता ‘या’ व्यक्तींना म्युच्युअल फंडात ट्रेडिंग करण्यावर निर्बंध; पाहा, नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:33 IST

SEBI ने म्युच्युअल फंडातील व्यापाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही कालावधीपासून शेअर बाजारासह म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळत आहे. यामधील कार्यरत कंपन्या उत्तम कामगिरी करत असून, चांगला परतावाही मिळत आहे. यातच आता सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया  म्हणजेच SEBI ने म्युच्युअल फंडातील व्यापाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका परिपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

सेबीने काढलेल्या परिपत्रकानुसार, म्युच्युअल फंड कंपनीचे कर्मचारी, विश्वस्त आणि संचालक मंडळाचे सदस्य ट्रेडिंग करू शकणार नाहीत. तसेच ज्यांच्याकडे कंपनीबद्दल कोणतीही माहिती आहे, त्यांना देखील हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यामुळे कंपनीचे निव्वळ मूल्य, मालमत्ता आणि युनिट धारकांचे हित प्रभावित होऊ शकते, असे यात म्हटले आहे. 

म्युच्युअल फंडामध्ये ट्रेडिंग करण्यास मनाई असेल

बाजार नियामक सेबीने यासाठी श्रेणी तयार केली असून, यामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना म्युच्युअल फंडामध्ये ट्रेडिंग करण्यास मनाई असेल. अॅक्सेस पर्सनमध्ये मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख, कार्यकारी संचालक, मुख्य गुंतवणूक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी आणि इतर सी-सूट अधिकारी, निधी व्यवस्थापक, डीलर्स, संशोधन विश्लेषक, ऑपरेशन विभागातील कर्मचारी, अनुपालन अधिकारी आणि अन्य विभाग प्रमुख यांचा समावेश होतो.

अॅक्सेस पर्सनची नवी श्रेणी

सेबीने सांगितले आहे की, गैर-कार्यकारी संचालक, कंपनीचे विश्वस्त किंवा असे कोणतेही विश्वस्त ज्यांना गैर-सार्वजनिक माहितीचे ज्ञान आहे आणि ते हितसंबंधांवर परिणाम करू शकतात. अशा व्यक्तींनाही नव्या अॅक्सेस पर्सनच्या यादीत ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ ते म्युच्युअल फंडात ट्रेडिंग करू शकणार नाहीत. सन २०१६ मध्ये सेबीने कर्मचार्‍यांना त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत कोणत्याही सिक्युरिटीच्या खरेदी आणि विक्रीतून नफा मिळवण्यास प्रतिबंध केले होते. 

दरम्यान, नवीन सर्क्युलेशनमध्ये अॅक्सेस पर्सनला काही शिथिलता देण्यात आली आहे. ही सूट आता अनुपालन अधिकाऱ्याद्वारे एका आर्थिक वर्षात दोनदा प्रवेश करणार्‍या व्यक्तीला देऊ शकते. या काळात ते फक्त सिक्युरिटी विकू शकतात. 

टॅग्स :व्यवसाय