Join us

सेबीनं एनएसईविरोधात ठोठावला 1100 कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 09:00 IST

व्यवहारात अनियमितता केल्याप्रकरणी सेबीनं नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईला 1,100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली-  व्यवहारात अनियमितता केल्याप्रकरणी सेबीनं नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईला 1,100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीनं हा दंड NSEच्या संगणकीय सव्‍‌र्हर प्रणालीचा गैरवापर करून दलालांना लाभ पोहोचवल्याचा ठपका ठेवून केला आहे. सेबीनं केलेल्या कारवाईत एनएसईचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण हे दोषी आढळले असून, या दोघांना कोणत्याही सूचिबद्ध कंपनी किंवा बाजार पायाभूत संस्थेशी व्यवहार करण्यास मज्जाव केला आहे.या प्रकरणात अन्य 16 जणांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. या दोघांनाही संबंधित कालावधीतील वेतनाच्या 25 टक्के रक्कम येत्या दीड महिन्यात दंडाच्या स्वरूपात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ‘सेबी’च्या या कठोर आदेशानंतर तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचं एनएसईनं स्पष्ट केलं आहे. वर्षं 2015मधल्या एका तक्रारीनंतर एनएसईची सह-स्थान (को-लोकेशन)ची सुविधा तपासाच्या जाळ्यात सापडली आहे. या प्रकरणात टिक बाय टिक (टीबीटी) डेटा रुपरेषेच्या संबंधित नियमांचं अपेक्षित पालन झालं नसल्याचं सेबीनं म्हटलं आहे. टीबीटी डेटा फीड ऑर्डर बुकसंदर्भात सर्व माहिती देतो. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’चे संचालक जी. महालिंगम यांनी मंगळवारी दिलेल्या 104 पानी आदेशात या घोटाळ्यावरील चौकशी तडीस नेली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामुळे देशातील सर्वात मोठ्या भांडवली बाजाराची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही.

टॅग्स :निर्देशांक