Join us

अॅमेझॉनला मोठा झटका! रिलायन्स-फ्यूचर ग्रुपच्या कराराला सेबीची मंजुरी

By देवेश फडके | Updated: January 21, 2021 12:13 IST

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (सेबी) फ्युचर ग्रुप आणि रिलायन्सच्या कराराला मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देअॅमेझॉनला मोठा धक्कारिलायन्स-फ्युचर ग्रुपच्या कराराला मंजुरीअॅमेझॉनचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा

नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंगमध्ये आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (सेबी) फ्युचर ग्रुप आणि रिलायन्सच्या कराराला मंजुरी दिली आहे. यानंतर मुंबई शेअर बाजाराकडूनही २४ हजार ७१३  कोटी रुपयांच्या करारास मान्यता देण्यात आली आहे. 

अॅमेझॉनकडून सेबी आणि अनेक नियामक मंडळाला पत्र लिहून या कराराला परवानगी न देण्याबाबत पत्र लिहिले होते. मात्र, काही अटींसह सेबीने या कराराला मान्यता दिली आहे. अॅमेझॉनसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यामुळे अॅमेझॉनचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्समध्ये करार करण्यात आला होता. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने रिलायन्सद्वारे फ्यूचर ग्रुपच्या रिटेल, होलसेल, लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंग व्यवसायाचे अधिग्रहण करण्यासाठी आधीच मान्यता दिली होती. मात्र, काही ठराविक करारासाठी मंजूरी आवश्यक होती. 

अ‍ॅमेझॉनने फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स यांच्यातील या महत्त्वाच्या कराराला विरोध केला होता. यासंदर्भात अ‍ॅमेझॉनने दिल्ली उच्च न्यायालयातही धाव घेतली. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयाने २१ डिसेंबर २०२० रोजीच्या निर्णयात अ‍ॅमेझॉनची याचिका फेटाळली होती. 

दरम्यान, अ‍ॅमेझॉनने २०१९ मध्ये फ्यूचर कूपनमध्ये ४९ टक्के भागिदारीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. यावेळी करण्यात आलेल्या करारामध्ये, फ्यूचरला दुसऱ्या कोणत्याही कंपनीसोबत करार करण्यापूर्वी अ‍ॅमेझॉनला माहिती देणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. परंतु, फ्यूचरने कोणतीही कल्पना न देता करार केल्याचे अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे.

टॅग्स :व्यवसायरिलायन्सअ‍ॅमेझॉन