Join us  

'स्कॉर्पिओ' खरेदीचा नाचून 'आनंद'; उद्योगपती महिंद्रांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 4:08 PM

व्हायरल व्हिडिओतील एका कुटंबाने महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्ही कार खरेदी केली

एखादं हक्काचं सुंदर घर असावं, त्या घरासमोर एक चारचाकी असावी असं सर्वसाधारण स्वप्न सर्वसामान्य माणसांचं असतं. त्यामुळे, घर बांधून झाल्यावर आणि गाडी खरेदी केल्यावर अख्ख्या कुटुंबीयांस आनंद होतो. प्रत्येकजण आपला आनंद आपल्या पद्धतीने साजरा करत असतो. कोणी फटाके वाजवून, कोणी मिठाई वाजवून तर कोणी जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त करतो. मात्र, एका कुटुंबाने महिंद्रा स्कॉर्पिओ कार खरेदी केल्यानंतर त्या नव्या-कोऱ्या गाडीसमोरच नाचून आनंद व्यक्त केला. सध्या या स्कॉर्पिओच्या खरेदीचा आनंद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यास, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही कमेंट करुन दाद दिली. 

महिंद्राची स्कॉर्पिओ एन कारची मार्केटमध्ये क्रेझ आहे. या कारच्या खरेदीसाठी ग्राहकांना बराच काळ वेटींग करावे लागते. त्यामुळेच, कारच्या डिलीव्हरीचा आनंद कंपनीपेक्षा अधिक ग्राहकांनाच होताना दिसून येतो. गतवर्षी लाँच करण्यात आलेली ही कार वर्षभर वेटींग पिरीयडमध्ये असल्याने ही कार घरी नेताना खरेदीदार व कुटुंबीयांस अत्यानंद होतो. 

व्हायरल व्हिडिओतील एका कुटंबाने महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्ही कार खरेदी केली. हा व्हिडीओ ट्विटरवर @CarNewsGuru1 या हॅण्डलने पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, – किती आनंदाचे वातावरण आहे. Mahindra Scorpio-N SUV ची डिलिव्हरी घेताना लोक आनंदाने नाचू लागले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही युजर्स हे छत्तीसगडमधील असल्याचा दावा करीत आहे. जिथे महिंद्रा कारची डिलिव्हरी घेण्यासाठी पोहोचलेले कुटुंब आनंदाने चक्क नाचू लागले.आनंद महिंद्रा यांनीही १९ मे रोजी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये, त्यांनी आनंद व्यक्त केलाय. ''भारतीय वाहन उद्योगात काम करण्याचा हा खरा पुरस्कार आणि आनंद आहे…'', असं कॅप्शनही महिंद्रा यांनी लिहिलंय. त्यावर, एका युजरने रिप्लाय देत लिहिले की, वेटिंग पीरियडच इतकाच आहे सर की आनंद होणे साहजिकच आहे, असे म्हटलंय. 

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, याला म्हणतात आनंद फक्त आनंद. तसेच, एका युजरने हा व्हिडीओ छत्तीसगडचा असल्याचा दावा करीत लिहिले की, आमच्या छत्तीसगडची गोष्ट काही औरच आहे. तर, एका युजरने मजेशीर कमेंट करत म्हटले की, हुंड्यात मिळाली असावी!. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. अनेक मजेशीर कमेंटर तर काही भावनिक कमेंटही वाचायला मिळत आहेत. 

टॅग्स :आनंद महिंद्रासोशल व्हायरलकारट्विटर