Join us

SBI च्या दोन नवीन शानदार डिपॉझिट स्कीम, गुंतवणुकीवर मिळेल चांगला रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:15 IST

​​​​​​​SBI New Saving Scheme : 'हर घर लखपती' (Har Ghar Lakhpati) आणि 'एसबीआय पॅट्रन्स' (SBI Patrons) अशी या दोन नवीन डिपॉझिट स्कीमची नावे आहेत. 

SBI New Saving Scheme : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कोट्यावधी ग्राहकांसाठी दोन नवीन डिपॉझिट स्कीम (ठेव योजना) सुरू करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने जारी केलेल्या प्रेस नोटद्वारे दोन स्कीम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. 'हर घर लखपती' (Har Ghar Lakhpati) आणि 'एसबीआय पॅट्रन्स' (SBI Patrons) अशी या दोन नवीन डिपॉझिट स्कीमची नावे आहेत. 

एसबीआयच्या मते, 'हर घर लखपती' ही एक प्री-कॅलक्युलेटिड रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे. जी ग्राहकांना १ लाख रुपये किंवा त्याच्या पटीत बचत करण्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. नवीन स्कीम तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात, जेणेकरून ग्राहक अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन करून बचत करू शकतील. एसबीआयची ही स्कीम अल्पवयीन मुलांसाठीही उपलब्ध आहे, जी लहान मुलांमध्ये लवकर आर्थिक नियोजन आणि बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देते.

याचबरोबर, एसबीआयने निवडक ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एसबीआय पॅट्रन्स' विशेष एफडी स्कीम सुरू केली आहे. ही स्कीम ८० वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. 'एसबीआय पॅट्रन्स' या नवीन स्कीमअंतर्गत, सामान्यपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. तसेच, ही स्कीम जुन्या आणि नवीन दोन्ही एफडी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, नवीन स्कीममधून हे स्पष्ट झाले आहे की, बँक नवीन गोष्टी करण्यावर खूप जोर देत आहे. पैसे जमा करण्याच्या बाबतीत बँक आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे.

एसबीआयचे चेअरमन सीएस सेट्टी म्हणाले की, 'आमचे उद्दिष्ट अशी बचत उत्पादने तयार करणे आहे, जे केवळ चांगला परतावाच देत नाहीत तर ग्राहकांच्या इच्छा आणि त्यांच्या आर्थिक लक्ष्याशी देखील जुळतात. दरम्यान एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी अधिक व्याजदरासह इतर डिपॉझिट स्कीम देखील सुरू केल्या आहेत. उदाहरणार्थ, एसबीआय व्ही-केअर डिपॉझिट स्कीम ५ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याज दर देते. तसेच, एसबीआय ४४४ दिवसांच्या एफडी स्कीमवर (अमृत वृष्टी) ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के व्याज देते. या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाबँकव्यवसाय