Join us
Daily Top 2Weekly Top 5

SBI Credit Cards कडून मोठी चूक, दोन लाखांचा ठोठावला दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 20:52 IST

एमजे अँथनी यांनी एसबीआय कार्ड्स अँड पेमेंटविरोधात तक्रार केली होती.

नवी दिल्ली : क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही लोकांना बरेच फायदे मिळतात. लोक क्रेडिट कार्डद्वारे आगाऊ पेमेंट करू शकतात आणि बक्षिसे तसेच कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. मात्र, आता क्रेडिट कार्डशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दरम्यान, एका क्रेडिट कार्ड्स कंपनीला दंड भरावा लागला आहे.

दिल्लीतील एका ग्राहक न्यायालयाने क्रेडिट कार्डची मुदत संपल्यानंतरही ग्राहकाला बिल पाठवल्याप्रकरणी एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेजला 2 लाख रुपयांची भरपाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी दिल्ली ग्राहक विवाद निवारण मंचाने क्रेडिट कार्ड जारीकर्त्या कंपनीला सेवेतील कमतरतेसाठी माजी पत्रकार एमजे अँथनी यांना पैसे देण्याचे निर्देश दिले आहेत. 

एमजे अँथनी यांनी एसबीआय कार्ड्स अँड पेमेंटविरोधात तक्रार केली होती. क्रेडिट कार्डची मुदत संपल्यानंतरही बिल देण्यात आले आणि शुल्क न भरल्याबद्दल प्रतिबंधित यादीत टाकण्यात आले, असे एमजे अँथनी यांनी सांगितले होते. तर ग्राहक मंचाने सांगितले की, तक्रारदाराचे नाव सिबिल सिस्टीममध्ये टाकल्यानंतर, अन्य बँकेनेही क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठीचा त्यांचा अर्ज नाकारला.

मोनिका ए श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक मंचाने सांगितले की, तक्रारकर्त्याला सेवा प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यामुळे आणि क्रेडिट रेटिंग खराब झाल्यामुळे नुकसान भरपाई पैशाने भरून काढता येत नाही. परंतु क्रेडिट कार्ड जारीकर्त्यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे एसबीआय कार्ड्सला दोन महिन्यांत दोन लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :एसबीआयव्यवसाय