Join us

Samsung Strike : ऐन सणासुदीत महिन्याभरापासून Samsung कंपनीचे कर्मचारी संपावर! काय आहेत मागण्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:45 IST

Samsung Workers: चेन्नई येथील सॅमसंग कंपनीतील कर्मचाऱ्यांचे गेल्या १ महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे समोर येत आहे.

Samsung Workers: जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याने अनेक मोठमोठ्या कंपन्यांना याचा फटका बसला आहे. अ‍ॅप्पल, मेटा, सॅमसंग सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी आपले अनेक प्रकल्प थांबवले आहेत. यातील बहुतेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. सॅमसंगच्या या निर्णयाने भारतीय कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे. सॅमसंगच्या चेन्नई प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू असलेला संप महिना उलटून गेला तरी संपलेला नाही. मंगळवारी पोलिसांनी ९०० हून अधिक संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याने वातवरण चिघळण्याची शक्यता आहे. या सर्वांना रस्त्यावर आंदोलन केल्याने ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, रात्री उशीरा त्यांना सोडून देण्यात आलं.

सॅमसंगच्या महसुलाला फटका बसणार?देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढते. अशा परिस्थितीत या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स प्लांटचा संप चौथ्या आठवड्यातही सुरूच आहे. गेल्या काही वर्षांतील हा देशातील सर्वात मोठा संप मानला जात आहे. या प्लांटमध्ये कंपनी रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि वॉशिंग मशिनसारखी उत्पादने बनवते. सर्व प्रयत्न करूनही तोडगा निघताना दिसत नाही. पगारवाढ, कामाचे तास सुधारावेत, युनियन CITU ला कंपनीने मान्यता द्यावी, अशा मागण्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

मागच्या महिन्यात १०४ जण ताब्यातपोलिसांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी सॅमसंगच्या ९१२ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या संपात सुमारे १ हजार कर्मचारी सहभागी आहेत. सॅमसंगच्या या प्लांटमध्ये सुमारे १८०० कर्मचारी काम करतात. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी १०४ जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणावर सॅमसंगकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या भागातील इतर कंपन्यांपेक्षा आम्ही लोकांना जवळपास दुप्पट पगार देत आहोत, असे त्यांनी सांगितले होते. तसेच कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न ऐकून सोडविण्यास आम्ही तयार असल्याचेही सांगितले.

कंत्राटी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींची भरतीयाआधी संप थांबवण्यासाठी कंपनीने न्यायालयातही धाव घेतल्याची माहिती समोर आली होती. यासोबतच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा इशारा नोटीसही बजावण्यात आली आहे. या संपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया व्हिजनलाही मोठा फटका बसला आहे. उत्पादनाला गती देण्यासाठी कंपनीने काही कंत्राटी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींची भरती केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. याआधी दक्षिण कोरियातील सॅमसंगच्या प्लांटवरही असेच आंदोलन पेटलं होतं.

टॅग्स :सॅमसंगसंपव्यवसाय