Join us  

अस्थिर वातावरणामुळे विक्रीचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 2:26 AM

लोकसभेची सुरू असलेली निवडणूक, महिन्याच्या अखेरच्या सप्ताहामुळे असलेली सौदापूर्ती, रुपयाची घसरती किंमत आणि खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमती अशा विविध घटकांमुळे मुंबई शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली

प्रसाद गो. जोशी

लोकसभेची सुरू असलेली निवडणूक, महिन्याच्या अखेरच्या सप्ताहामुळे असलेली सौदापूर्ती, रुपयाची घसरती किंमत आणि खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमती अशा विविध घटकांमुळे मुंबई शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. सप्ताहाच्या उत्तरार्धात झालेल्या मोठ्या विक्रीमुळे बाजार खाली आला. असे असले तरी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये अल्पशी वाढ झालेली दिसून आली.मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३९,२६२.२२ ते ३८,५१८.२६ अंशांच्या दरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३९,०६७.३३ अंशांवर विसावला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ७२.९५ अंशांची घट झाली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही सप्ताहादरम्यान खूपच अस्थिरता दिसून आली. मात्र सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक अवघा १.८५ अंश वाढून ११,७५४.६५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र मोठी घसरण झाली. मिडकॅप ३१८.५८ अंशांनी खाली येऊन १५,०६३.९९ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये २०७.८२ अंशांची घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस तो १४,८१३.३८ अंशांवर बंद झाला आहे. विक्रीच्या दबावामुळे या निर्देशांकाला १५ हजार अंशांचा टप्पा कायम राखता आली नाही.अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापारविषयक बोलणी आगामी सप्ताहामध्ये काही ठोस निर्णयापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये नरमाईचे वातावरण होते. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे तसेच रुपयाची किंमत कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत काहीशी चिंता निर्माण झाली. त्याचप्रमाणे जपान आणि युरोपमधील प्रमुख देशांमधील उत्पादन कमी झाले आहे. या सर्व घटकांच्या परिणामी भारतामध्ये विक्रीचा दबाब वाढला. यामुळे निर्देशांक खाली आले.

पहिल्या पंधरवड्यात बॅँकांच्या कर्जामध्ये वाढचालू आर्त्रिक वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये बॅँकांकडील कर्जामध्ये १४.१९ टक्के तर ठेवींमध्ये १०.६० टक्कयांनी वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीमधून हे पुढे आले आहे. १२ एप्रिल रोजी संपलेल्या या आर्थिक वर्षामधील पहिल्या पंधरवड्यामध्ये बॅँकांच्या कर्जामध्ये १४.१९ टक्कयांनी वाढ होऊन ते ९६.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याच काळात बॅँकांकडील ठेवी १२५.३० लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. ठेवींमधील वाढ १०.६० टक्के आहे. मार्च, २०१९ अखेर बँकांकडील ठेवी १०.३ टक्के दराने वाढलेल्या होत्या तर कर्जामध्ये १३.२४ टक्कयांनी वाढ झालेली होती. एक वर्षापूर्वी बॅँकांकडील ठेवी आणि कर्जाची रक्कम अनुक्रमे ११३.२९ लाख कोटी व ८४.४६ लाख कोटी रुपये एवढी होती. कर्जामध्ये दुहेरी अंकाने वाढ होण्याचा हा सलग दुसरा पंधरवडा आहे.

टॅग्स :शेअर बाजारनिवडणूक