Join us  

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचेही भाव कडाडले, भारताने रशियाकडून महागड्या किमतीत खरेदी केले सूर्यफुलाचे तेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 6:12 PM

Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या टंचाईचा सामना करत असलेल्या भारताने रशियासोबत सूर्यफुलाच्या तेलाची आयात करण्यासाठी मोठा करार केला आहे. ४५ हजार टन सूर्यफुलाच्या तेलाचा हा करार खूप महागड्या दरात करण्यात आला आहे, आतापर्यंतचा हा सर्वात महाग दर आहे.

 नवी दिल्ली - रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या टंचाईचा सामना करत असलेल्या भारताने रशियासोबत सूर्यफुलाच्या तेलाची आयात करण्यासाठी मोठा करार केला आहे. ४५ हजार टन सूर्यफुलाच्या तेलाचा हा करार खूप महागड्या दरात करण्यात आला आहे, आतापर्यंतचा हा सर्वात महाग दर आहे. दरम्यान, या तेलाची डिलिव्हरी पुढच्या म्हणजेच एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळात देशांतर्गत बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच जोपर्यंत रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू राहील. तोपर्यंत भारतातील सर्वसामान्य जनतेवर महागाईचे बॉम्ब पडत राहतील.

युद्धामुळे युक्रेनने सूर्यफुलाच्या तेलाचा पुरवठा थांबवला आहे. त्याशिवाय इंडोनेशियाने पामतेलाच्य पुरवठ्यावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण अमेरिकेमध्येही सोयाबीनचे पिक कमी आले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाची उपलब्धता घटून किमती वाढल्या आहेत. त्यामुळेच हा सौदा खूप अधिक किमतीवर झाला आहे. भारत जगातील सर्वात मोठा खाद्यतेलाची आयात करणारा देश आहे. सूर्यफुलाच्या तेलाची सर्वाधिक आयात ही युक्रेनमधूनच होत होती.

जेमिनी इडिबल्स अँड फॅट्स इंडिया प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप चौधरी यांनी सांगितले की, युद्धात अडकल्याने युक्रेनकडून पुरवठा शक्य नाही आहे. त्यामुळे भारतातील व्यापाऱ्यांनी रशियाकडून पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जेमिनी इडिबल्सने रशियाकडून १२ हजार टन कच्चे सूर्यफुलाचे तेल खरेदी करण्यासाठी करार केला आहे. त्याचा पुरवठा एप्रिल महिन्यात होणार आहे.   

टॅग्स :युक्रेन आणि रशियाभारत