Join us

रुपया रडवणार; महागाई वाढणार, पेट्रोल स्वस्ताई टळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 06:27 IST

Rupee vs Dollar: गेल्यावर्षी जानेवारीत एका डॉलरसाठी ८३ रुपये मोजावे लागत होते. आता ८७ रुपयांच्या आसपास मोजावे लागतात. म्हणून आयात वस्तू महाग होत आहेत.

- पवन देशपांडे 

मुंबई : निवडणुका सरल्या आता महागाई कमी होईल, पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल व कर्ज स्वस्तात मिळेल, या आशेवर तुम्ही असाल, तर सध्या तरी हे विसरा. रुपयावर डॉलर भारी पडू लागलाय. त्याचा सर्वसामान्यांवरील परिणाम काही दिवसांतच दिसेल. गेल्यावर्षी जानेवारीत एका डॉलरसाठी ८३ रुपये मोजावे लागत होते. आता ८७ रुपयांच्या आसपास मोजावे लागतात. म्हणून आयात वस्तू महाग होत आहेत.

इंधन होईल महाग आपण ८४ टक्के इंधन आयात करतो. त्यासाठी डॉलरचा वापर होतो. रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देऊ नये, अशी तंबी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. महागडा डॉलर, त्यात कच्च्या तेलाचे दर जास्त यामुळे पेट्रोल-डिझेल महाग होऊन देशांतर्गत महागाई वाढेल. 

मोबाइल-लॅपटॉप भारत मोबाइल उत्पादनाचा हब होत असला तरी त्याचा कच्चा माल परदेशातून येतो. तो मागवण्यासाठी अधिक पैसै खर्च होतील. इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीवरही वाढत्या डॉलरचा परिणाम होईल. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स महाग होतील. 

शिक्षण, पर्यटन परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना डॉलरमध्ये फीस भरावी लागते, त्या खर्चात वाढ होईल. तसेच, परदेशात G पर्यटन करणाऱ्यांना डॉलर महाग झाल्यामुळे जास्त खर्च करावा लागतो.

नोकऱ्यांवर परिणाम डॉलर वधारल्यामुळे, कंपन्यांना कच्चा माल आणि इतर वस्तू महाग पडू शकतात, ज्यामुळे त्यांना खर्च कमी करण्यासाठी कामगारांची संख्या कमी करावी लागू शकते किंवा वेतन वाढवण्यात अडचणी येऊ शकतात. 

टॅग्स :व्यवसाय