Join us

खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:13 IST

Rupee At Record Low : अमेरिकेकडून आयात शुल्क वाढण्याची भीती असताना भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. याचा थेट परिणाम सामान्य लोकांवर होणार आहे.

Rupee Record Low : शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्याने मध्यमवर्गींयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, हा दिलासा फार काळ टीकेल असे वाटत नाही. कारण, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. रुपया पहिल्यांदाच ८७ रुपयांपर्यंत गेला आहे. चलन बाजाराच्या सुरुवातीला, डॉलरच्या तुलनेत रुपया ४२ पैशांच्या घसरणीसह ८७.०६ वर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतर १० मिनिटांतच तो ५५ पैशांवर आला होता. सध्या भारतीय रुपया ८७.१२ रुपये प्रति डॉलरवर घसरला आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे.

रुपया का घसरतोय?डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर डॉलर आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे भारतीय चलनाची किंमत कमी होत आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत चलन व्यवहारांवर परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे डॉलरचे आकर्षण वाढत आहे. याच्या विरोधात काम करताना सर्व चलनांमध्ये घसरण दिसून येत आहे. विशेषकरुन विकसनशील देशांच्या चलनांना यामुळे फटका बसत आहे.

भारतीय चलन नीचांकी पातळीवरसुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांनी घसरून ८७.१६ च्या नीचांकी पातळीवर आला. रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय आयटी कंपन्यांना फटका बसत आहे. अशा परिस्थितीतही विप्रो शेअर्सना फायदा होताना दिसत आहे. आयटी कंपन्यांना डॉलरमध्ये महसूल मिळतो. परिणामी देशातील आयटी कंपन्यांना डॉलरच्या मजबूतीचा फटका बसू शकतो.

रुपया घसरल्यानंतर सर्वसामान्यांना तोटा कसा?रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी झाली तर त्याचा परिणाम थेट आयात खर्चावर होतो. भारत कुठलीही वस्तू किंवा उत्पादन आयात करण्यासाठी डॉलरचा वापर करतात. अशा परिस्थितीत रुपया घसरला तर या गोष्टीसाठी पूर्वी ८५ रुपये द्यावे लागत होते. आता तिथे ८७ रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागेल. याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होतो. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असते. भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कच्चे तेल अशा गोष्टी बाहेरुन आयात करतो. अशात या वस्तूंच्या किमती वाढू शकतात. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहागाईव्यवसाय