Join us

रुपया घसरला; सार्वकालिक नीचांकावर, १ डॉलर ८५.५० रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:42 IST

ही २ वर्षातील सर्वाधिक एकदिवसीय घसरण ठरली आहे. 

नवी दिल्ली : आंतरबँक विदेशी चलन विनिमय बाजारात शुक्रवारी रुपया २३ पैशांनी घसरून ८५.५० रुपयांवर खाली आला. म्हणजेच १ डॉलरची किंमत ८५.५० रुपये झाली. हा रुपयाचा सार्वकालिक नीचांक ठरला आहे. तसेच ही २ वर्षातील सर्वाधिक एकदिवसीय घसरण ठरली आहे. 

बँका आणि आयातदार यांनी महिनाअखेरीस व्यवहार पूर्ण करण्यासाठी डॉलरची जोरदार खरेदी केली. त्यामुळे रुपयाने मोठी आपटी खाल्ली. त्यातच अल्पकालीन करारांच्या पूर्ततेसाठी डॉलर रोखून धरण्याची भूमिका रिझर्व्ह बँकेने घेतल्यामुळे विनिमय बाजारात डॉलरचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे डॉलर मिळविण्यासाठी आयातदारांना धावाधाव करावी लागली. परिणामी, डॉलर आणखी वर चढला.

२ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वाधिक घसरण

चलन बाजारात रुपया सकाळी कमजोरीसह ८५.३१ वर उघडला होता. ५३ पैशांच्या घसरणीसह तो ८५.८० पर्यंत खाली आला. ही सार्वकालिक एकदिवसी घसरण ठरली. 

नंतर रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून बाजारात डॉलर ओतल्याने रुपयात थोडी सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस रुपया २३ पैशांच्या घसरणीसह ८५.५० वर बंद झाला. 

आदल्या सत्रात रुपया ८५.२७ वर बंद झाला होता. याआधीची सर्वोच्च एकदिवसीय घसरण २ फेब्रुवारी २०२३ रोजी झाली होती. त्यादिवशी रुपया ६८ पैशांनी घसरला होता. 

टॅग्स :अमेरिका