Join us  

घरांच्या तुलनेत व्यावसायिक बांधकामांची धाव तोकडी; दुसऱ्या तिमाहीत व्यवहार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:20 AM

विक्री आणि नव्या बांधकामांत मोठी घट

मुंबई : राज्य सरकारने मुद्र्रांक शुल्कात घसघशीत सवलत दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मोठी चालना मिळताना दिसत आहे. मात्र, मुंबईतले हे व्यवहार कोरोना काळातील पहिल्या तिमाहीपेक्षा दुसºया तिमाहीत ५० टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, याच काळात नव्या व्यावसायिक प्रकल्प आणि तिथल्या बांधकामांची विक्री मात्र रोडावल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत देशातील उर्वरित शहरांमधील व्यवहार वाढलेले दिसत आहेत.

नाईट फ्रँक या सल्लागार संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती हाती आली आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत दीड कोटी चौरस फुटांचे बांधकाम झाले होते. कोरोना दाखल झाल्यानंतर एप्रिल ते जून या तिमाहीत १६ लाख चौरस फुटांचे बांधकाम झाले असून, सप्टेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीत ते बांधकाम ३६ लाख चौरस फुटांपर्यंत वाढले आहे. मात्र, या आघाडीवर देशाचे आर्थिक केंद्र्र असलेल्या मुंबईचा विचार केल्यास या तीन तिमाहीत नव्या बांधकामांचे क्षेत्रफळ २५ लाख, ११ लाख आणि ३ लाख असे घसरत गेले आहे.

विक्री झालेल्या बांधकामांच्या आघाडीवर देशातील व्यवहार १३ लाख ४० हजार चौरस फुटांवरून २ लाख ४० हजारांवर घसरला होता. तो आता ४ लाख ४० हजारांपर्यंत वाढला आहे. मात्र, मुंबईत या तीन तिमाहींमध्ये अडीच लाख, १ लाख ३० हजार आणि एक लाख असे टप्प्याटप्प्याने व्यवहार घसरत गेले आहेत.मुंबई शहरांतील वाढते कोरोनाचे संक्रमण आणि जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे देशाच्या या आर्थिक राजधानीतल्या व्यवहारांना फटका बसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शेवटच्या तिमाहीत ही परिस्थिती सुधारेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :घर