Join us  

पैसे खर्च करण्याचा नियम : ५०-३०-२०; घरचा जमाखर्च लिहा, रेकॉर्ड ठेवा, जाणून घ्या कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 4:47 AM

आपण नीट नोंदी ठेवल्या तर आपल्याकडे येणारा पैसा आपल्याशी राहील, वाढेल; नाहीतर तो वाहून कुठं गेला, हेही आठवत नाही.

पी. व्ही. सुब्रमण्यम,  आर्थिक सल्लागार

आपल्या घरचा जमाखर्च लिहा, रेकॉर्ड ठेवा, वर्षानुवर्षे गृहकर्जाचं रेकॉर्ड ठेवा असं सांगितलं की लोक असे चेहरे करतात की, काहीही काय सांगताय? पण तरीही मी सांगतो की, आपल्या शारीरिक वजनाचे आकडे आणि घराच्या खर्चाचे आकडे यांचं रेकॉर्ड ठेवा म्हणजे कळतं कुठं चुकलं, कुठं काय जमलं. नाहीतर भसकन खड्डा पडतो आणि मग धावपळ होते. तर हा खर्च  लिहायचा महत्त्वाचा नियम एकच : ५०-३०-२०.- हे खर्च विभागायचे तीन टप्पे.

म्हणजे असं समजा की तुम्ही ३० वर्षांचे आहात. नुकतं लग्न झालेलं आहे, तर तुमच्या वेतनाच्या किमान ५० टक्के खर्च हा मूलभूत गरजा भागवण्यासाठी होणार हे उघड आहे. घरभाडं, ऑफिसला जाण्याचा प्रवास खर्च, जेवणखाण-किराणा, मेडिकल आणि लाइफ इन्श्युरन्स. इथे मी ‘मूलभूत’ हा शब्द हा वापरला आहे याकडे लक्ष द्या. रोजचं घरचं जेवण, किराणा, भाजी, दूध यासाठीचा खर्च. सीसीडी-बरिस्ता-कॉफी, बाहेर जेवायला जाणं याचा खर्च नाही. प्रवासखर्च म्हणजे सार्वजनिक वाहनं किंवा साधी कार किंवा बाईकचं पेट्रोल.  मेडिक्लेमसह विम्याचे हप्ते. हा झाला मूलभूत खर्च जो टाळता येणार नाही.

दुसरा टप्पा ३० टक्के खर्च. ज्याला गोल सेव्हिंग म्हणतात. म्हणजे घर घ्यायचं तर डाऊन पेमेण्टची तयारी, कारचे हप्ते, मुलांचं शिक्षण, पर्यटन खर्च, निवृत्ती प्लॅन  यासाठीची तयारी. हे सगळं या ३० टक्क्यांत बसवायचं. पुढचा टप्पा २० टक्के.  हा लाइफस्टाइल खर्च. फोन, आयपॉड, कॉम्प्युटर, डिझायनर कपडे, फॅन्सी जीम यावर होणारा खर्च. आता कुठल्या टप्प्यात आपण आवश्यक खर्च करतोय, कुठला अनावश्यक, कुठे पैसे वाचवता येतील याचा जमाखर्च लिहा. कुठल्या गटात आपण ठरवल्याप्रमाणे पैसे खर्च करतोय, कुठं जास्त हे पहा. जसं तुमचं वय वाढेल हे सूत्र बदलेल.. वेतन वाढलं तरी बदलेल. पण वय वाढणं अटळ त्यामुळे निवृत्ती नियोजनावर जो खर्च कमी होता तो वाढेल, वैद्यकीय खर्च, मुलांचं शिक्षण यावर जो खर्च कमी होता तो वाढेल.

आपण नीट नोंदी ठेवल्या तर आपल्याकडे येणारा पैसा आपल्याशी राहील, वाढेल; नाहीतर तो वाहून कुठं गेला, हेही आठवत नाही.मग “पूर्वी मी बारीक होतो, वजन कसं वाढलं कळलंच नाही”, हे जसं लोक म्हणतात तेच पैशांचंही होतं. आलेला पैसा कुठं गेला हेच माहीत नाही.

टॅग्स :पैसा