मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरण्यावर नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांमुळे घरभाडे भरणा करणाऱ्या लाखो लोकांना फटका बसणार आहे. यापुढे क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरण्यासाठी घरमालक हा व्यापारी म्हणून नोंदणीकृत असणे व केवायसी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनेकदा क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे दाखवून पैसे आपल्याच खात्यात वळते केले जात होते. यामुळे या सेवेचा गैरवापर केला जात होता. यामुळे सरसकट सर्वांनाच घरभाडे वळते करता येणार नाही. या नियमानुसार, फोनपे (PhonePe), पेटीएम (Paytm) सारख्या सर्व पेमेंट ॲप्सनी ही सेवा बंद केली आहे. ही सेवा वापरण्यासाठी घरमालकांच्या बँक खात्याची पडताळणी करावी लागणार आहे. परंतू, अनेक ठिकाणी हे शक्य होणार नाही. कारण टॅक्स लागेल म्हणून घरमालक व्यापारी म्हणून स्वत:ची नोंद करण्यास तयार होणार नाही.
आतापर्यंत अनेक लोक क्रेडिट कार्डने घरभाडे भरून रिवॉर्ड पॉईंट्स मिळवत होते, तसेच व्याजमुक्त क्रेडिटचा वापर करत होते. नव्या नियमांमुळे त्यांना या सुविधांचा गैरफायदा घेता येणार नाही. त्यांना भाडे भरण्यासाठी युपीआय (UPI), एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS), आयएमपीएस (IMPS) किंवा चेक यांसारख्या पर्यायी माध्यमांचा वापर करावा लागेल. या निर्णयामुळे अनेक पेमेंट ॲप्स आणि ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, हा नियम क्रेडिट कार्डच्या सुरक्षित वापरासाठी महत्त्वाचा असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.