Join us  

टाटानंतर मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ५ वर्ष पगार अन् मुलांना शिक्षण देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 10:47 AM

COVID-19, Mukesh Ambani Decision for Employees: दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही रिलायन्स उचलणार आहे.

ठळक मुद्देकोरोना महामारीचं संकट पाहता मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहेआईवडील आणि मुलांच्या हॉस्पिटालायजेशन कवरेज १०० टक्के प्रिमियम कंपनीकडून भरला जाईलटाटानेही कर्मचाऱ्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती

मुंबई – कोविड महामारीच्या काळात अनेकांच्या त्यांच्या जवळची माणसं गमावली आहेत. घरातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचं दिसून येत आहे. यातच रतन टाटा यांच्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिलायन्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.

रिलायन्स इंडियानं कोरोनामुळं जीव जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पुढील ५ वर्ष पूर्ण पगार देणार असून १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतही देणार आहेत. तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही रिलायन्स उचलणार आहे. कोरोना महामारीचं संकट पाहता मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनी ५ वर्षापर्यंत पगार आणि मुलांच्या शिक्षणासाठी ट्यूशन फी, हॉस्टेलचा खर्च आणि पुस्तकांचा खर्च उचलणार आहे.

कुटुंबाला मिळणार आर्थिक आधार

त्याशिवाय पदवीपर्यंत शिक्षण होईपर्यंत पती किंवा पत्नी, आईवडील आणि मुलांच्या हॉस्पिटालायजेशन कवरेज १०० टक्के प्रिमियम कंपनीकडून भरला जाईल. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला एकरकमी १० लाख रुपये दिले जातील.

कोविड १९ सुट्टी

ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला संक्रमण झालं असेल तर शारिरीक, मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोविड १९ सुट्टी दिली जाऊ शकते. ही सुट्टी पॉलिसीत वाढवण्यात आली असून रिलायन्सच्या सर्व कर्मचारी पूर्णपणे बरे होण्यासाठी किंवा कुटुंबातील कोविड १९ पॉझिटिव्ह सदस्यांची देखभाल करण्यावर फोकस करू शकतील.

टाटा कंपनीचाही कर्मचाऱ्यांना दिलासा

आपल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना त्या कर्मचाऱ्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत (म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याच्या रिटायरमेंटच्या वयापर्यंत) संपूर्ण वेतन देण्यात येईल. एवढेच नाही तर, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थादेखील कंपनीच करेल आणि अशा कुटुंबांना वैद्यकीय तसेच निवासाची सुविधाही मिळत राहील, अशी घोषणा टाटाने केली होती.

काय म्हटले आहे, कंपनीने -

टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटलं की, "कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि भागधारकांच्या हितासाठी कार्यरत आहे. या कोरोना साथीच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहे." यापूर्वीही टाटाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक पाऊले उचलली आहेत आणि एक आदर्श बनवला आहे.

 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सकोरोना वायरस बातम्या