Join us  

Farmers Protest : "काँट्रॅक्ट फार्मिंगशी काही देणे-घेणे नाही, आम्ही शेतकऱ्यांकडून काहीही खरेदी करत नाही"

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 04, 2021 1:33 PM

रिलायन्सकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यात, या तीनही कृषी कायद्यांसंदर्भात आपल्याला काहीही देणे-घेणे नाही आणि या कायद्यांचा कंपनीला काहीही फायदा नाही.

नवी दिल्ली -दिल्ली बॉर्डरवर नव्या कृषी कायद्यांवरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, याच वेळी रिलायन्सच्या प्रोडक्ट्सचादेखील मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. जिओच्या मोबाईल टॉवर्सना निशाणा बनवले जात आहे. आता यासंदर्भात रिलायन्सकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यात, या तीनही कृषी कायद्यांसंदर्भात आपल्याला काहीही देणे-घेणे नाही आणि या कायद्यांचा कंपनीला काहीही फायदा नाही. तसेच, भविष्यातही कंपनीचा असा कुठलाही हेतू नाही. ते थेट शेतकऱ्यांकडून काहीही खरेदी करत नाहीत, असे रिलायन्सने म्हटले हे. 

रिलायन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे, कंपनीने कधीही कॉर्पोरेट अथवा काँट्रॅक्ट पद्धतीने शेती केलेली नाही. तसेच भविष्यातही कंपनीची या व्यापारात उतरण्याची इच्छा नाही. कंपनीने पंजाब, हरियाणा अथवा भारतात कुठेही कॉर्पोरेट अथवा काँट्रॅक्ट फार्मिंगसाठी जमीण खरेदी केलेली नाही. 

कंपनीने म्हटले आहे, की रिलायन्सने शेतकऱ्यांकडून खरेदीसंदर्भात कधीही कुठल्याही प्रकारचा दीर्घकालीन करार केला नाही. रिलायन्स आपल्या सप्लायरनासुद्धा एमएसपीवर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या बाजूने आहे. कंपनी देशातील अन्नदात्यांचा सन्मान करते. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य तो मोबदला मिळायलाच हवा, या विचाराला कंपनीचा पूर्ण पाठिंबा आहे.

जिओच्या टॉवर्सचे मोठे नुकसान -शेतकरी आंदोलनादरम्यानच पंजाबच्या विविध भागांत जिओच्या मोबाईल टॉवर्सचे वीज कनेक्शन कट केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा पद्धतीने शेतकरी नव्या कायद्यांना विरोध करत असल्याच दावा केला जात आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी, या घटनांचे समर्थन केलेले नाही.

रिलायन्स जिओचे ट्रायला पत्र - तत्पूर्वी, रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) पत्र लिहून वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपनीविरोधात तक्रार केली आहे. वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप जिओने केला आहे. ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत जिओने या दोन्ही कंपन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. 

उत्तर भारतातील विविध भागांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलने चुकीच्या मार्गांचा अवलंब केल्याचे जिओने ट्रायला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. शेतकरी आंदोलनातून निर्माण झालेल्या जनतेच्या संतापाचा फायदा उचलत दोन्ही कंपन्या खोटा प्रचार करत असल्याचे जिओचे म्हणणे आहे. याआधी 28 सप्टेंबरलाही ट्रायला पत्र लिहून याबाबतचा खुलासा केला होता. तरीही या कंपन्यांकडून अजूनही खोटा प्रचार सुरूच असल्याचे जिओ कंपनीकडून पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :रिलायन्स जिओरिलायन्सशेतकरी संपदिल्लीपंजाब